साधे, सरळ, सुरक्षितपणे जगताना माणसाचा मुळीच कस लागत नाही. मात्र आव्हाने, वादविवादांच्या वादळांचा समर्थपणे मुकाबला करताना माणसाची आणि त्याच्या नेतृत्वक्षमतेची खरी ओळख पटते. k03झारखंडसारख्या राज्यातील ‘रांचीचा राजपुत्र’ म्हणून ओळखला जाणारा महेंद्रसिंग धोनी एके काळी रेल्वेत तिकीट तपासनीस म्हणून नोकरी करायचा. परंतु काळाचा महिमा अगाध. मेहनत आणि जिद्दीच्या बळावर धोनी भारताचा यशस्वी कर्णधार म्हणून उदयास आला. २००७चा ट्वेन्टी-२० विश्वचषक, त्यानंतर २०११चा एकदिवसीय विश्वचषक, २०१२मध्ये आयसीसी चॅम्पियन्स करंडक आणि कसोटी क्रिकेटमधील अव्वल स्थान या स्वप्नवत वाटणाऱ्या गोष्टी धोनीच्या नेतृत्वाखाली भारताला साध्य करता आल्या. अशक्यप्राय सामना जिंकून देण्याची एक दैवी देणगी त्याच्याकडे होती. त्यामुळेच ‘ग्रेट फिनिशर’च्या यादीत त्याचे नाव सन्मानाने घेतले जाऊ लागले. पण उंच उंच भरारी घेणारा हा आलेख, अचानक खालच्या दिशेने वाटचाल करू लागला आहे. बांगलादेशविरुद्धच्या ताज्या मालिकेनंतर पराभवाची कारणमीमांसा करताना धोनी लक्ष्यस्थानी आहे. त्याचे नेतृत्व, खिलाडूवृत्ती, संघसहकाऱ्यांची पाठराखण, खेळाडूंची निवड हे सारे काही ऐरणीवर आहे. धोनी आणि कोहलीचे मतभेद हे नवे समीकरण या पराभूत वातावरणाला खमंग फोडणी देत आहे. स्वाभाविकपणे ‘कोण होतास तू, काय झालास तू..’ हा फरक मात्र सहजपणे धोनीची कारकीर्द अस्ताला चालल्याची जाणीव करून देत आहे. त्यामुळेच धोनीला निवृत्तीचा सल्ला दिला जात आहे.
गेली काही वष्रे धोनीसाठी मुळीच अनुकूल नव्हती. स्पॉट-फिक्सिंग, सट्टेबाजी प्रकरणात आयपीएलमधील त्याचा चेन्नई सुपर किंग्जचा संघ केंद्रस्थानी होता. या सर्व प्रकरणात महत्त्वाची भूमिका बजावणारा चेन्नईचा तो खेळाडू कोण, हे अद्यापि गुलदस्त्यात असले तरी धोनीकडे संशयाने पाहिले जाऊ लागले होते. त्याच्यावर हितसंबंधांचे आरोप झाले. हे वादळ शमते, न शमते तोच कसोटी क्रिकेटमधील भारताचे अपयश आणि त्याची सूर हरवलेली फलंदाजी यावर ताशेरे ओढले जाऊ लागले. परिणामी धोनीने कसोटी क्रिकेटमधील नेतृत्वाचा काटेरी मुकुट खाली ठेवला. याच काळात भारतीय संघाला मार्गदर्शन करणारे संचालक-प्रशिक्षक रवी शास्त्री आणि विराट कोहली यांची नवी आघाडी स्थापन झाली. त्यामुळे कुरघोडीचे राजकारण सुरू झाले. दोन कर्णधारांना न्याय देणे हे भारतीय क्रिकेट मानसिकतेला झेपणारे नाही, हे सत्य बांगलादेशातील पराभवातून समोर येत आहे.
बांगलादेशविरुद्धच्या पहिल्याच एकदिवसीय सामन्यात एकेरी धाव घेताना मुस्ताफिझूर रहमानला धक्का दिल्यामुळे धोनी अडचणीत सापडला. आयसीसीने या प्रकरणाची शहानिशा करून दोघांनाही दोषी ठरवले. धोनीला मोठा दंड ठोठावण्यात आला. काही वर्षांपूर्वी आपल्या चांगल्या वागणुकीमुळे आयसीसीचा खिलाडूवृत्तीचा पुरस्कार पटकावणारा हाच का धोनी, हा प्रश्न कुणालाही सहजपणे पडणारा होता. या मालिकेत धोनीच्या फलंदाजीची जादू हरवली असल्याचे सहजपणे दिसून येत होते. धोनी चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी उतरत होता, पण तो त्या स्थानाला न्याय मात्र देऊ शकला नाही. धोनीने ३ सामन्यांत १२१ धावा केल्या, परंतु त्यासाठी १५९ चेंडू खर्ची घातले. त्याच्या फटक्यांमध्ये ‘माही’रता नव्हती.
भारताच्या अपयशाला तसे फक्त धोनीला जबाबदार धरता येणार नाही. रोहित शर्माला रहमानचे चक्रव्यूह कधीच भेदता आले नाही. एकीकडे रहमान कमाल करीत असताना भारताची वेगवान गोलंदाजी झगडताना दिसत होती. विराट कोहलीला ३ सामन्यांत जेमतेम ४९ धावा करता आल्या. रवींद्र जडेजाच्या अष्टपैलुत्वाची ‘सर’ ओसरल्याचे जाणवत होते. पण अशा प्रकारचा कठीण कालखंड धोनीच्या नेतृत्वाच्या काळात जेव्हा-जेव्हा आला, त्या वेळी धोनीने आपली ‘कॅप्टन कुल’ ही उपाधी सार्थ ठरवली होती. एखाद्-दुसऱ्या सामन्यात खेळाडू अपयशी ठरला, तर त्याला त्वरित विश्रांती देणे ही धोनीची मानसिकता नव्हती. उलटपक्षी त्याच खेळाडूच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहून तो त्यांना धीर द्यायचा. पण बांगलादेशविरुद्धच्या मालिकेत त्याने अनेक बदल केले. याचप्रमाणे काही खेळाडूंचे कच्च दुवे त्याने चव्हाटय़ावर आणले. अजिंक्य रहाणेला पहिल्या सामन्यात ९ धावा काढता आल्या. म्हणून दुसऱ्या सामन्यात त्याला वगळण्यात आले. त्यावर भाष्य करताना धोनी म्हणाला, ‘‘वेगवान खेळपट्टय़ांवर अजिंक्य चांगला खेळतो. परंतु धिम्या खेळपट्टय़ांवर चौथ्या किंवा पाचव्या क्रमांकावर मोकळेपणाने फलंदाजी करताना प्रारंभी त्याला अडचणी येतात.’’ तिसरा एकदिवसीय सामना जेमतेम जिंकल्यानंतरसुद्धा धोनी सहजपणे बोलून गेला, ‘‘भारताने चांगला विजय मिळवला. परंतु आता एक निर्णय घ्यावा लागेल की, आपल्याला वेग असलेले गोलंदाज हवेत की, वेग नसलेले चांगले गोलंदाज हवेत. चांगली गोलंदाजी न करू शकणाऱ्या अनेक वेगवान गोलंदाजांना आपण संघात स्थान देत आहोत.’’ धोनीचा रोख नेमक्या कोणत्या गोलंदाजांवर होता, ते सहज लक्षात येण्याजोगे आहे. या परिस्थितीत विराट कोहली म्हणतो, ‘‘आमची निर्णयक्षमता शंकास्पद होती आणि मैदानावर ती दिसून यायची. पहिल्या दोन सामन्यांतील विजयाचे श्रेय अर्थात बांगलादेश संघाला द्यायला हवे. परंतु आमच्या खेळात संदिग्धता होती.’’ या सर्व गोष्टींचा अर्थ लावून प्रसारमाध्यमांनी आता धोनी-कोहली वादाला नवी दिशा दिली आहे. पण या काळातसुद्धा धोनी आपल्या ‘मर्जी’तल्या खेळाडूंना जपून होता आणि वेळप्रसंगी मी कर्णधारपद सोडून खेळाडू म्हणून संघात राहीन, हे सांगायलाही तो कमी पडला नाही.
तूर्तास, बांगलादेशविरुद्धच्या पराभवाबाबत धोनीला जबाबदार धरले जात आहे. त्याने एकदिवसीय क्रिकेटचे नेतृत्व सोडावे, ही मागणी जोर धरू लागली आहे. शाहीद आफ्रिदीप्रमाणे काही खेळाडू धोनीच्या वाईट कालखंडात त्याची पाठराखण करीत आहेत. त्यामुळे भारतीय क्रिकेटचा आता कोणता चेहरा समोर येतो, ते पाहणे उत्सुकतेचे ठरेल.
प्रशांत केणी – prashant.keni@expressindia.com