भारताचा मर्यादित षटकांच्या क्रिकेट संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने एकदिवसीय सामन्यांमध्ये चौथ्या क्रमांकावरच फलंदाजीला यावे, असे मत भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने व्यक्त केले आहे.

‘‘धोनीने चौथ्या क्रमांकावरच फलंदाजीला यायला हवे, कारण या क्रमांकावर फलंदाजीला आल्यावरही धोनी विजयावर शिक्कामोर्तब करू शकतो. विजयवीराने ४०व्या षटकामध्येच फलंदाजीला यावे, असे काही नाही. विराट कोहली तिसऱ्या स्थानावर फलंदाजीला आल्यावर तोदेखील विजयवीराची भूमिका वठवू शकतो. विजयवीराने अखेरच्या षटकांमध्ये यावे, ही संकल्पना चुकीची आहे,’’ असे गांगुली म्हणाला. भारत आणि न्यूझीलंड यांच्यामध्ये रांची येथे बुधवारी चौथा एकदिवसीय सामना झाला. या सामन्यात न्यूझीलंडने भारताला १९ धावांनी पराभूत केले.

सध्याच्या घडीला विराट कोहलीने चांगल्या धावा केल्या तर भारतीय संघ जिंकतो, असे काही जणांना वाटते. पण गांगुलीला मात्र असे वाटत नाही. याबाबत गांगुली म्हणाला की, ‘‘कोहली हा दमदार खेळाडू आहे. पण भारतीय संघ त्याच्यावरच अवलंबून आहे, असे मला वाटत नाही. न्यूझीलंडचा संघही चांगली कामगिरी करीत आहे, त्यांनीही काही सामने जिंकले आहेत.’’

धोनीचीही चौथ्या क्रमांकालाच पसंती

विजयवीराची भूमिका कठीण असते. त्यासाठी पाचव्या, सहाव्या किंवा सातव्या क्रमांकावर फलंदाजीला येऊन ती प्रत्येकवेळी यशस्वीपणे वठवता येऊ शकत नाही, असे म्हणत भारताचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने चौथ्या क्रमांकालाच पसंती दर्शवली आहे.

‘‘तळाला येऊन फलंदाजी करणे ही सोपी गोष्ट नाही, खासकरून चौथ्या एकदिवसीय सामन्याच्या खेळपट्टीवर. कारण खेळपट्टी संथ होत गेली तर फलंदाजी करणे सोपे नसते. त्यासाठी सातत्याने धावा काढाव्या लागतात आणि मोठी भागीदारी उभारावी लागते. या परिस्थितीमध्ये पाचव्या, सहाव्या किंवा सातव्या क्रमांकावर येऊन विजयवीराची भूमिका वठवणे सोपे नसते,’’ असे धोनी म्हणाला.

भारताच्या मधल्या फळीतील फलंदाजांना जास्त अनुभव नाही. याबाबत धोनी म्हणाला की, ‘‘मधल्या फळीतील फलंदाजांना अजून थोडा वेळ द्यायला हवा. त्यांना थोडा वेळ दिला तर ते नक्कीच मार्ग शोधून काढतील. जेवढे जास्त सामने ते खेळतील तेवढा त्यांच्या अनुभवामध्ये वृद्धी होईल. कारण तळाला येऊन फलंदाजी करणे ही सोपी गोष्ट नाही.’’

तो पुढे म्हणाला की, ‘‘चौथ्या सामन्यातील खेळपट्टी संथ होत गेली. त्यामुळे या खेळपट्टीवर धावा करणे सोपे नव्हते. आमच्यासाठी ही कठीण परिस्थिती होती. या खेळपट्टीवर स्थिरस्थावर होऊन भागीदारी करणे महत्त्वाचे असते. जेव्हा चांगली भागीदारी होती तेव्हा धावा सहजपणे येतात, पण भागीदारी रचण्यासाठी संयम महत्त्वाचा असतो. न्यूझीलंडचे गोलंदाज अचूक गोलंदाजी करत होते, त्यामुळे या सामन्यात धावा करणे सोपे नव्हते.’’ भारतीय संघ विराट कोहलीवर अवलंबून आहे का, असे विचारल्यावर धोनी म्हणाला की, ‘‘तुम्हाला जसे वाटते तसे नाही. आकडेवारी प्रत्येक वेळी योग्य चित्र दाखवत नाही.’