मोक्याच्या क्षणी पराभवाच्या छायेतून टीम इंडियाला विजयाची दिशा मिळवून देणाऱया आणि दबाव असतानाही शांतपणे खेळणाच्या कौशल्यामुळे ‘कॅप्टनकूल’ची बिरुदावली प्राप्त झालेला, भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधाराने मंगळवारी कसोटी क्रिकेटला अलविदा केले.  भारतीय संघाला कसोटी क्रिकेटच्या क्रमवारीत अव्वल स्थान प्राप्त करून देणाऱया महेंद्र सिंग धोनीच्या कसोटी कारकीर्दीवर टाकलेला प्रकाशझोत..

एकदिवसीय सामन्यांतील चांगली कामगिरी पाहून महेंद्रसिंग धोनीची डिसेंबर २००५ साली भारताच्या कसोटी संघात दिनेश कार्तिकच्या जागी यष्टीरक्षक म्हणून निवड करण्यात आली होती. कसोटी क्रिकेटमध्ये पहिल्या सामन्यात श्रीलंकेविरुद्ध धोनीने ३० धावा ठोकल्या होत्या. त्यानंतर पुढील कसोटीत केवळ ५१ चेंडूत अर्धशतक ठोकून धोनीने आपल्यातील चमक दाखवून दिली. पुढे पाकिस्तान विरुद्ध फेब्रुवारी २००६ मध्ये धोनीने आपले पहिलेवहिले कसोटी शतक ठोकून आपल्या आक्रमक खेळीचे दर्शन घडवून दिले. त्यानंतर धोनीचा आलेख आजवर कायम चढताच राहीला.
फोटो गॅलरी: धोनीचा कसोटी क्रिकेटला अलविदा…
धोनीने आजवरच्या कसोटी कारकीर्दीत ९० कसोटी सामने खेळताना ३८.४०च्या सरासरीने  ४८७६ धावा केल्या आहेत. यामध्ये ६  दमदार शतकांचा आणि ३३ अर्धशतकांचा समावेश आहे. कसोटी क्रिकेटमधील धोनीची २२४ धावांची सर्वोत्कृष्ट खेळी आजही क्रिकेटरसिकांच्या लक्षात आहे. चेन्नईच्या स्टेडियमवर धोनीने ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या कसोटी सामन्यात तब्बल ८४.५२ च्या सरासरीने २२४ धावांचा डोंगर रचला. एक लक्षवेधी कर्णधार म्हणून धोनीने अनेक कसोटी सामन्यांत महत्त्वाच्या वेळी आपल्या क्लृप्त्या वापरून अशक्यप्राय परिस्थितीत संघाला विजय प्राप्त करून दिला आहे. त्याच्या याच कौशल्यामुळे अनेक क्रिकेटपटू आणि इतर संघांचे कर्णधार देखील त्याचे चाहते राहिले आहेत. सामना तणावपूर्ण स्थितीत असताना एक कर्णधार म्हणून चेहऱयावरील शांतभावाने सहकाऱयांचे मनोबल वाढवणाच्या अदभूत कलेने धोनीला इतर कर्णधारांपेक्षा वेगळे ठरवले. ‘टीम इंडिया’च्या या यशस्वी कर्णधाराला सलाम…