भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी आणि सध्याचा कर्णधार विराट कोहली यांची लोकप्रियता दिवसागणिक वाढताना दिसते. दोघांनीही क्रिकेटच्या मैदानात आपल्या कामगिरीतून स्वत:ची अशी वेगळी ओळख निर्माण केली. दोघांचेही देशासह जगभरात असंख्य चाहते आहेत. देशात सध्या आयपीएलची हवा आहे.

 

ट्वेन्टी-२० क्रिकेटमध्ये आयपीएलची लोकप्रियता देखील भन्नाट आहे. आयपीएल म्हटलं की क्रिकेट रसिकांसाठी चौकार, षटकारांची बरसात आणि रंगतदार सामने पाहण्याची अनोखी पर्वणी असते. त्यात आयपीएलचे हे यंदाचे दहावे पर्व आहे. सोशल मीडियावरही आयपीएलचाच जलवा पाहायला मिळतो. सोशल मीडियात बदलत्या ट्रेंडनुसार आयपीएलने यंदा स्पर्धेतील काही मोजक्या खेळाडूंचे इमोजी देखील नेटीझन्सना उपलब्ध करून दिले होते. क्रिकेटचे मैदान गाजवणाऱ्या कोहली आणि धोनी यांनी इमोजींच्या लोकप्रियतेतही आघाडी घेतली. ट्विटरवर आतापर्यंत वापरण्यात आलेल्या खेळाडूंच्या इमोजीमध्ये कोहली आणि धोनी यांचे इमोजी सर्वाधिक वापरले गेले आहेत. तर तिसऱ्या क्रमांकावर एबी डीव्हिलियर्स याचा नंबर लागतो.

ट्विटरकरांना खेळाडूंच्या नावाचा हॅशटॅग तयार करून हे इमोजी वापरतात येतात. त्यानुसार आतापर्यंत धोनी आणि कोहली यांचे हॅशटॅग सर्वाधिक वापरले गेले. सर्वाधिक हॅशटॅग वापरलेले गेलेले पहिले दहा खेळाडू – धोनी, कोहली, एबी डीव्हिलियर्स, गौतम गंभीर, युवराज सिंग, रोहित शर्मा, स्टीव्ह स्मिथ, सुरेश रैना, डेव्हिड वॉर्नर आणि भुवनेश्वर कुमार हे आहेत.