निवड समिती अध्यक्ष संदीप पाटील यांचा खुलासा

भारताचा कसोटी कर्णधार विराट कोहलीकडे एकामागून एक विजय मिळवताना ट्वेन्टी-२० संघाचे कर्णधार त्याच्याकडे देणार असल्याची चर्चा सुरु झाली होती. या चर्चेला पूर्णविराम देत धोनीकडे ट्वेन्टी-२० विश्वचषकापर्यंत कर्णधारपद कायम ठेवण्यात आले आहे, असा खुलासा भारताच्या राष्ट्रीय समितीचे अध्यक्ष संदीप पाटील यांनी केला आहे.

काही दिवसांपासून प्रसारमाध्यमांमध्ये कोहलीकडे ट्वेन्टी-२० संघाचे कर्णधारपद सोपवण्यात येणार असल्याचे वृत्त आले होते. त्यामुळे खेळाडूंबरोबरच चाहत्यांमध्येही संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते.

‘‘प्रसारमाध्यमांमधल्या तर्कविर्तकांना पूर्णविराम देत धोनीकडे ट्वेन्टी-२० विश्वचषकापर्यंत कर्णधारपद कायम ठेवण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. प्रसारमाध्यमांमधील वृत्तांमुळे खेळाडूंमध्येही संभ्रमाचे वातावरण होते. त्यामुळे त्यांचा कर्णधार नक्की कोण आहे, हे सांगण्याचे काम आम्ही केले आहे. धोनीशी चर्चा करूनच आम्ही हे संघ निवडले आहेत,’’ असे पाटील यांनी सांगितले.

धोनीच्या भवितव्याबाबतचा प्रश्न विचारल्यावर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) सचिव अनुराग ठाकूर म्हणाले की, ‘‘ खेळाडूंच्या भवितव्याचा निर्णय बीसीसीआय घेत नसते. हे काम निवड समितीचे आहे. धोनी हा भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार आहे. त्याने भारताला दोन विश्वचषक जिंकवून दिले आहेत. त्यामुळेच धोनीकडे ट्वेन्टी-२० विश्वचषकापर्यंत कर्णधारपद कायम ठेवण्याचा निर्णय निवड समितीने घेतला आहे.’’