भारत-झिम्बाब्वे पहिला एकदिवसीय सामना आज; प्रदीर्घ कालावधीनंतर झिम्बाब्वेला मायदेशात खेळण्याची संधी
बऱ्याच वर्षांनंतर कर्णधार महेंद्रसिंग धोनीला पुन्हा एकदा युवा खेळाडूंची मोट बांधण्याची संधी मिळाली असून याचे परिणाम झिम्बाब्वे दौऱ्यात पाहायला मिळणार आहे. भारतीय संघ झिम्बाब्वेच्या दौऱ्याला युवा खेळाडूंच्या साथीने सुरुवात करणार आहेत. शनिवारी पहिल्या एकदिवसीय सामन्याने दौऱ्याचा श्रीगणेशा होणार असून धोनीच्या युवा ब्रिगेडसाठी ही सोपी परीक्षा असेल, असे म्हटले जात आहे.
आयपीएलनंतर संघातील स्थान निश्चित केलेल्या खेळाडूंना विश्रांती मिळावी आणि युवा खेळाडूंना संधी देण्यात यावी, यासाठी झिम्बाब्वेच्या दौऱ्याचे आयोजन बीसीसीआय करते, असे म्हटले जाते. यापूर्वी २०१३ आणि २०१५ साली भारताने अनुक्रमे ५-० आणि ३-० असा विजय मिळवला होता. २००५ साली धोनी सौरव गांगुलीच्या नेतृत्वाखाली झिम्बाब्वेच्या दौऱ्यावर आला होता. त्यामुळे ११ वर्षांनंतर धोनी झिम्बाब्वेमध्ये खेळणार असून पहिल्यांदाच नेतृत्व करण्याची त्याला संधी मिळणार आहे. त्याचबरोबर कर्णधार आणि सध्याचा त्याचा फॉर्म पाहता धोनीसाठी झिम्बाब्वेचा दौरा महत्त्वपूर्ण असेल. भारताच्या १५ सदस्यीय एकदिवसीय संघातील पाच खेळाडूंना अजूनही पदार्पणाची संधी मिळालेली नाही. आतापर्यंत धोनीच्या नावावर २७५ एकदिवसीय सामने आहेत, तर संघातील सर्व खेळाूंनी मिळून फक्त ८३ सामने खेळले आहेत. त्यामुळे हा संघ अननुभवी असाच असेल. पण धोनीला युवा खेळाडूंची मोट बांधून त्यांच्याकडून दमदार कामगिरी करणे चांगलेच जमते. या दौऱ्यातही त्याच्याकडून हीच अपेक्षा असेल.
संघातील जसप्रीत बुमराह, अंबाती रायुडू आणि अक्षर पटेल या तिघांनाच एकदिवसीय सामन्यांचा जास्त अनुभव आहे. मनीष पांडे आणि केदार जाधव यांनी गेल्या वेळी याच दौऱ्यामध्ये पदार्पण केले होते, पण त्यांना संघातील स्थान अजूनही निश्चित करता आलेले नाही. त्यामुळे या दोघांकडे संघातील स्थान निश्चित करण्याची दुसरी संधी असेल. करुण नायर व के. एल. राहुल यांच्यासाठी हा दौरा सुवर्णसंधी असेल. यंदाच्या आयपीएलमध्ये चमकदार कामगिरी करणारा फिरकीपटू यजुवेंद्र चहलला संघात स्थान देण्यात आले आहे. फैझ फझल, जयंत यादव व मनदीप सिंग यांनी स्थानिक क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केली आहे.
वुशीमुझी सिबांडा, सिकंदर रझा, सीन विल्यम्स, चामू चिभाभा,
एल्टन चिगुंबुरा, वेलिंग्टन मसाकाझा
या झिम्बाब्वेच्या खेळाडूंना आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा चांगला अनुभव आहे. या वेळी ग्रॅमी क्रीमरकडे संघाची कमान सोपवण्यात येणार
असून त्याच्या नेतृत्वावर साऱ्यांचेच लक्ष असेल.

संघ
भारत : महेंद्रसिंग धोनी (कर्णधार आणि यष्टिरक्षक), के. एल. राहुल, फैझ फझल, मनीष पांडे, करुण नायर, अंबाती रायुडू, केदार जाधव, मनदीप सिंग, रिषी धवन, जसप्रीत बुमराह, जयंत यादव, यजुवेंद्र चहल, जयदेव उनाडकट, धवल कुलकर्णी, अक्षर पटेल.
झिम्बाब्वे : ग्रॅमी क्रीमर (कर्णधार), तेंदाई चटारा, चामू चिभाभा, एल्टन चिगुंबुरा, तेंटाई चिसोरो, क्रेग इव्‍‌र्हिन, नेव्हिल मॅडझिव्हा, टिमिसेन मरुमा, हॅमिल्टन मसाकाझा, वेलिंग्टन मसाकाझा, पीटर मूर, ट्वानाडा मुपारिव्हा, रिचर्ड मुटुमबामी (यष्टीरक्षक), ताऊराई मुझाराबानी, वुशीमुझी सिबांडा, सिकंदर रझा, डोनाल्ड तिरिपानो आणि सीन विल्यम्स.

वेळ : दुपारी १२.३० वाजल्यापासून.
थेट प्रक्षेपण : टेन क्रिकेट.