मुंबई व एअर इंडिया यांनी वरिष्ठ गटाच्या राष्ट्रीय ‘अ’ श्रेणी हॉकी स्पर्धेत आव्हान राखले. चुरशीच्या झालेल्या लढतीत यजमान महाराष्ट्राने सेनादलाला १-१ असे बरोबरीत रोखले. रेल्वे व हरयाणा यांनीही विजयी वाटचाल राखली.
शिवछत्रपती क्रीडानगरीत सुरू असलेल्या या स्पर्धेत एअर इंडियाने मध्य प्रदेशचा ७-३ असा पराभव करीत उपांत्य फेरी गाठली. त्या वेळी त्यांच्याकडून शिवेंद्रसिंग व अरमान कुरेशी यांनी प्रत्येकी दोन गोल केले. गगनप्रीतसिंग, मोहन मुथन्ना व विक्रम पिल्ले यांनी प्रत्येकी एक गोल करीत त्यांना चांगली साथ दिली. मध्य प्रदेशकडून विकास चौधरीने दोन गोल नोंदविले तर मुनीस कुरेशीने एक गोल केला.
व्हिक्टोसिंगने सहाव्या मिनिटाला केलेल्या अप्रतिम गोलामुळेच मुंबई संघाने पंजाब संघाविरुद्ध १-० असा निसटता विजय मिळविला. विशाल पिल्लेने ४२व्या मिनिटाला नोंदविलेल्या गोलमुळेच महाराष्ट्राला सेनादलाविरुद्ध १-१ अशी बरोबरी साधता आली. चौथ्या मिनिटाला देविंदरसिंगने चौथ्या मिनिटाला सेनादलाचे खाते उघडले होते.
अमित रोहिदासने केलेल्या तीन गोलांच्या जोरावर रेल्वे संघाने कर्नाटक संघावर ७-३ अशी मात केली. विनोदकुमारसिंग याने दोन गोल करीत त्याला चांगली साथ दिली. तलविंदरसिंग व युवराज वाल्मीकी यांनीही एक गोल नोंदवीत रेल्वेच्या विजयास हातभार लावला. कर्नाटकच्या शेशे गौडा, पी. थिमय्या व जे. पी. कुश यांनी प्रत्येकी एक गोल करीत चांगली लढत दिली. हरयाणा संघाने उत्तर प्रदेशवर ४-२ असा विजय मिळविला. त्यांच्याकडून शिवदीप, जितेंदर सरोहा, मनदीप अंतील व गगनदीपसिंग यांनी प्रत्येकी एक गोल केला. उत्तर प्रदेशच्या सुनील यादव व अमीर खान यांनी प्रत्येकी एक गोल केला.