इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल)  पावलांवर पाऊल ठेवत इंडियन बॅडमिंटन लीगच्या (आयबीएल) गौरवशाली अध्यायाला बुधवारी मोठय़ा उत्साहात प्रारंभ होत आहे. परंतु मुंबईकरांना या स्पध्रेची कमालीची उत्सुकता लागून राहिली आहे. कारण सायना नेहवाल, ज्वाला गट्टा या भारताच्या दिग्गज खेळाडूंसह मलेशियाचा अव्वल बॅडमिंटनपटू ली चोंग वेई यांचा खेळ पाहण्याची दुर्मीळ संधी त्यांना लाभणार आहे.
सायना नेहवाल या नावातच मोठी जादू दडली आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर सायनानेच सातत्यपूर्ण प्रदर्शन करत भारताचा झेंडा ऑलिम्पिकमध्येही फटकत ठेवला. चीनच्या मातब्बर खेळाडूंनांही नमवता येते, हा विश्वास सायनानेच मिळवून दिला. सायनाच्या यशामुळेच देशभरात बॅडमिंटन प्रसाराला मोठी गती मिळाली. मात्र एवढे असूनही सायनाला प्रत्यक्ष खेळताना पाहण्याची संधी मुंबईकरांना मिळत नव्हती. आंतरराष्ट्रीय स्पर्धाचे अतिशय व्यस्त वेळापत्रक आणि त्रासदायक दुखापती यामुळे तिला मुंबई खेळायची संधी मिळाली नव्हती. मात्र ‘आयबीएल’च्या निमित्ताने ‘भारताच्या फुलराणीचा’ खेळ ‘याचि देहा, याचि डोळा’ पाहण्याची संधी मिळणार आहे. वरळीतील सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियममध्ये १९ ऑगस्टला हैदराबाद हॉटशॉट्स व पुणे पिस्टन्स यांच्यात मुकाबला रंगणार आहे. या लढतीत सायना हैदराबादकडून लढणार आहे.  कनिष्ठ स्तरावरच्या स्पर्धामध्ये सहभागी होण्यासाठी लहानपणी सायना मुंबई, ठाण्यात येत असे. सायनाने मुंबईत शेवटची स्पर्धा २००६मध्ये खेळली होती.
मुंबईतील दोनदिवसीय टप्प्यादरम्यान मुंबईकरांना भारतीय बॅडमिंटन तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील दिग्गजांचा खेळ पाहता येणार आहे. बिनधास्त स्वभाव आणि रोखठोक वक्तव्यासाठी प्रसिद्ध ज्वाला गट्टा मुंबईत खेळणार आहे. क्रिश दिल्ली स्मॅशर्सचे प्रतिनिधित्व करणारी ज्वाला मुंबई मास्टर्सविरुद्धच्या लढतीत दिसेल. याच सामन्यात अव्वल बॅडमिंटनपटू ली चोंग वेईला प्रत्यक्ष खेळताना अनुभवता येणार आहे. एरव्ही केवळ टीव्हीच्या किंवा यु-टय़ूबच्या माध्यमातून लीच्या थरारक खेळाची अनुभूती घेता येते. मात्र २० तारखेला मुंबई संघाकडून खेळणाऱ्या वेईच्या नावाचा जयघोष करण्याची सुवर्णसंधी मुंबईकरांना आहे.
याशिवाय माजी विश्वविजेता आणि महान खेळाडू तौफिक हिदायतसुद्धा मुंबईत खेळणार आहे. हैदराबादच्या संघात मुंबईकर अजय जयराम आणि पुण्याच्या प्रज्ञा गद्रेचा समावेश आहे. मूळच्या पश्चिम बंगालचा परंतु बॅडमिंटनचे प्रशिक्षण ठाण्यात गिरवणारा शुभंकर डे याच संघात आहे. पुणे पिस्टन्स संघातर्फे दुहेरी विशेषज्ञ अश्विनी पोनप्पा खेळणार आहे. तिच्या साथीला सौरभ वर्मा, अनुप श्रीधर हे गुणवान भारतीय खेळाडू आहेत. याच संघात ज्युलियन शेंक ही अखिल इंग्लंड विजेती खेळाडू आहे.
ज्वाला गट्टा आणि व्ही. दिजू ही मिश्र दुहेरीतील भारताची आशादायी जोडी. अनेक महिन्यांनंतर या जोडीला एकत्रित पाहण्याचा योग जुळणार आहे. याचप्रमाणे एच. एस. प्रणॉय, बी. साईप्रणीथ आणि नागपूरकर अरुंधती पनतावणे हीसुद्धा मंडळी मुंबईत खेळणार आहेत. मुंबई मास्टर्स संघात प्रणव जेरी चोप्रा आणि एन. सिक्की रेड्डी या दुहेरी विशेषज्ञ युवा खेळाडूंचा समावेश आहे. याच संघात टायने बूनसारखी दिग्गज खेळाडू आहे. अशा रीतीने १९ आणि २० ऑगस्टला मुंबईकरांसाठी बॅडमिंटनची मेजवानीच ठरणार आहे. याशिवाय ३१ ऑगस्टला आयबीएलचा पहिला विजेता संघ मुंबईकरांच्याच साक्षीने विजेतेपदाचा चषक उंचावणार आहे.