मुंबई महाकाळ संघाने सांगली रॉयल्स संघावर ३३-२८ अशी मात करीत महाकबड्डी लीगमधील पुरुष गटात बाद फेरीच्या आशा कायम राखल्या. महिलांमध्ये याच दोन संघांमधील सामना मुंबईने १७-१६ असा सुवर्णचढाईद्वारे जिंकला.

शिवछत्रपती क्रीडानगरीत सुरू असलेल्या या स्पर्धेत महिलांमध्ये मुंबई सांगली हा सामना विलक्षण चुरशीने खेळला गेला. सामन्याच्या पहिल्या पाच मिनिटांमध्ये सांगलीने ६-२ अशी आघाडी घेतली होती. त्यांची रिबेका गवारेने सुरेख पकडी करीत संघाला चांगली सुरुवात करुन दिली होती. सायली कचरची तिला योग्य साथ लाभली. परंतु मुंबईची कर्णधार सायली केरिपाळेने चढाया व पकडी या दोन्ही आघाडय़ांवर प्रभावी खेळ करीत ७-७ अशी बरोबरी साधली. पूर्वार्धात दोन्ही संघांमध्ये ९-९ अशी बरोबरी होती. शेवटची पाच मिनिटे बाकी असताना मुंबईच्या बेबी जाधवने चढाईत दोन गडी बाद करीत संघाला १५-१३ अशी आघाडी मिळवून दिली. मात्र सांगलीच्या पूजा शेलारने दोन गुण मिळवत बरोबरी साधली. हा सामना १६-१६ अशा बरोबरीत संपल्यानंतर सुवर्णचढाईचा उपयोग करण्यात आला. यात मुंबईच्या सायलीने चढाईत एक गुण मिळवत संघाला रोमहर्षक विजय मिळवून दिला.

पुरुषांमध्ये मुंबईच्या नितीन देशमुखने एकाच चढाईत तीन गुण वसूल करीत झकास सुरुवात केली. मुंबईच्या नितीनबरोबरच देवेंद्र कदम व मयूर शिवतरकर यांनी अष्टपैलू खेळ केला. पूर्वार्धात १३-१३ अशी बरोबरी होती. पाच मिनिटे असताना उमेश म्हात्रेने एकाच चढाईत तीन गुण वसूल करीत सांगलीवर लोण चढवत संघाला २८-२६ अशी आघाडी मिळवून दिली. शेवटच्या तीन मिनिटांमध्ये मुंबईच्या विकास काळेने लागोपाठ दोन पकडींमध्ये गुण मिळवत संघाची बाजू बळकट केली. शेवटच्या चढाईत म्हात्रेने दोन गडी बाद केले व संघाला ३३-२८ असा विजय मिळवून दिला.