क्रिकेटप्रमाणेच गजबजलेले डी. वाय. पाटील स्टेडियम.. फुटबॉलच्या आनंदात न्हाऊन निघालेल्या चाहत्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.. मुंबई सिटी एफसीने सुरुवातीपासूनच केलेली गोलांची बरसात.. अशा या फुटबॉलमयी वातावरणात मुंबई संघाने एफसी पुणे सिटीचा ५-० असा धुव्वा उडवीत इंडियन सुपर लीगमध्ये घरच्या मैदानावर शानदार सुरुवात केली. आंद्रे मॉरित्झच्या हॅट्ट्रिकमुळे स्टेडियमवरील उपस्थित चाहत्यांना फुटबॉलची दर्जेदार पर्वणी अनुभवता आली. सुभाष सिंग सिंगम आणि योहान लेट्झेल्टर यांनीही मुंबईच्या विजयात योगदान दिले. आयएसएलमधील आतापर्यंतचा हा सर्वात मोठा विजय नोंदवीत मुंबई सिटी एफसीने दिवाळीआधीच दिवाळी साजरी केली.  

उद्घाटनाच्या लढतीत अ‍ॅटलेटिको डी कोलकाताविरुद्धच्या पराभवातून धडा घेणाऱ्या मुंबईने सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ करीत पहिल्या सत्रावर वर्चस्व गाजवले. खेळाच्या सुरुवातीलाच मुंबईच्या पीटर कोस्टा आणि पुण्याच्या लेनी रॉड्रिगेझ यांना पिवळे कार्ड दाखवल्यानंतर १२ व्या मिनिटाला मुंबईच्या आंद्रे मॉरित्झने मुंबईसाठी आयएसएलमधील पहिला गोल लगावला. उजव्या बाजूकडून लालरिंडिका राल्टेकडून मिळालेल्या पासवर मॉरित्झने पुण्याचा गोलरक्षक इमान्युएल बेलार्डी याला कोणतीही संधी न देता गोल केला. २५ व्या मिनिटाला मुंबईच्या नडाँग भूतियाने सुरेख चाल रचत गोल करण्याची संधी निर्माण केली. त्याने हेडरवर मारलेला फटका बेलार्डीने हवेत झेप घेऊन बाहेर ढकलला. त्यानंतर राल्टेकडून मिळालेल्या क्रॉसवर ब्राझीलच्या मॉरित्झने हळूच चेंडूला गोलजाळ्याची दिशा दाखवली.

३७ व्या मिनिटाला मुंबईसाठी सुभाष सिंग सिंगम धावून आला. मुंबईच्या जॅन स्टोहान्झलकडून मिळालेल्या पासवर चेंडूला पुढे नेत त्याने पुणे सिटीच्या सर्व बचावरक्षकांना मागे टाकले. त्यानंतर त्याच्यासमोर फक्त गोलरक्षक बेलार्डीचा अडथळा होता. ही संधी वाया न घालवता सुभाषने डाव्या पायाने चेंडू गोलजाळ्यात ढकलला. त्यानंतर चार मिनिटांनी अशीच परिस्थिती असताना सुभाषला मात्र बेलार्डीला चकवता आले नाही. त्याने मारलेला फटका गोलजाळ्याच्या बाजूने गेला. या तीन गोलमुळे मुंबईने ३-० अशी आघाडी घेतली.
दुसऱ्या सत्राची सुरुवात मात्र निराशाजनक झाली. ६४ व्या मिनिटाला मुंबईला फ्री-किकची संधी मिळाली. पण स्टोहान्झलला या संधीचे सोने करता आले नाही. ७१ व्या मिनिटाला मॉरित्झने तिसरा गोल करीत हॅट्ट्रिक साजरी केली. या गोलमुळे मुंबईचा विजय जवळपास निश्चित झाल्यामुळे मुंबईच्या चाहत्यांना धडाकेबाज खेळाची पर्वणी अनुभवता आली. ८५ व्या मिनिटाला योहान लेट्झेल्टरने गोलक्षेत्रात मुसंडी मारल्यानंतर त्याने ड्रिब्लिंगचे सुरेख कौशल्य दाखवत पुण्याच्या बचावपटूंची भक्कम भिंत भेदली. त्यानंतर उजव्या पायाने चेंडूला गोलजाळ्याची दिशा दाखवत मुंबईच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.
मुंबई सिटी एफसी ५-०  वि. एफसी पुणे सिटी
आंद्रे मॉरित्झ (१२*, २७*, ७१*)
सुभाष सिंग सिंगम (३७*)
योहान लेट्झेल्टर (८५*)

चाहत्यांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे स्टेडियम दणाणले
इंडियन सुपर लीग या भारतातील फुटबॉलच्या महासोहळ्यासाठी नवी मुंबईतील डी. वाय. पाटील स्टेडियमवर चाहत्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळाला. जणू क्रिकेटचाच सामना सुरू असल्याचा भास होत होता. नवी मुंबईतूनच नव्हे तर मुंबई, ठाणे आणि पुणे, नाशिकमधील चाहत्यांनी मुंबई सिटी एफसीच्या घरच्या मैदानावरील पहिल्या सामन्यासाठी २७ हजार प्रेक्षकांनी गर्दी केली होती. जवळपास निम्मे स्टेडियम ‘मुंबई, मुंबई’, ‘जितेगा भाई जितेगा..’, ‘गणपती बाप्पा मोरया’ अशा घोषणा देत चाहत्यांनी दणाणून सोडले होते.

मुंबई-पुण्याच्या खेळाडूंमध्ये मारामारी
पहिल्या सत्रात मुंबई सिटी एफसीने तीन गोल लगावून महत्त्वपूर्ण आघाडी घेतल्यामुळे एफसी पुणे सिटीचे खेळाडू नाराज झाले होते. दुसऱ्या सत्रात मैदानावर उतरल्यानंतर ५० व्या मिनिटाला मुंबई आणि पुण्याच्या खेळाडूंमध्ये मारामारी झाली. मुंबईच्या जॅन स्टोहान्झलला पुण्याच्या खेळाडूंनी धक्काबुक्की केली. पण रेफ्री ख्रिस्तोफर पेन्सो यांनी मध्यस्थी करीत आणखी वाद टाळला. रेफ्रींनी स्टोहान्झलला मात्र पिवळे कार्ड दाखवले.