मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या (एमसीए) प्रशिक्षकपदाची निवड पुन्हा लांबणीवर पडली आहे. एमसीएचे दोन संयुक्त सचिव आयपीएलच्या सामन्यांसाठी दुबईवारीला जात असल्यामुळे प्रशिक्षकपदाची निवड पुढे ढकलण्यात आली आहे. परंतु भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू अजित आगरकरची मुलाखत बाकी असल्यामुळे प्रशिक्षकपदाचा निर्णय अद्याप घेण्यात आलेला नाही, असे विश्वसनीय सूत्रांकडून समजते.
एमसीएच्या निवड समितीचे नवनिर्वाचित अध्यक्ष संदीप पाटील यांच्याशी सल्लामसलत करून मुंबईच्या प्रशिक्षकपदाचा निर्णय २५ एप्रिलला घेण्यात येईल, असे १४ एप्रिलला झालेल्या कार्यकारी समितीच्या बैठकीत निश्चित करण्यात आले होते. परंतु एमसीएचे दोन संयुक्त सचिव नितीन दलाल आणि पी. व्ही. शेट्टी आयपीएल सामन्यांसाठी संयुक्त अरब अमिरातीच्या दौऱ्याला जाण्याचे ठरले. त्यामुळे एमसीएची बैठक २५ ऐवजी २३ एप्रिलला घेण्याचे नंतर ठरले. परंतु कार्यकारिणी समितीवरील काही सदस्यांना निवडणुकीसंदर्भातील काही महत्त्वाच्या जबाबदाऱ्या असल्यामुळे ही बैठक रद्द करण्यात आली. त्यामुळे आता मे महिन्याच्या पहिल्या आठवडय़ात मुंबईच्या प्रशिक्षकपदाच्या नियुक्तीला मुहूर्त मिळू शकेल.
विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, प्रशिक्षकपदासाठी उत्सुक असलेल्या आगरकरने अद्याप एमसीए कार्यकारिणीसमोर मुलाखत दिलेली नाही. १४ तारखेला तो परदेशात असल्यामुळे एमसीएच्या मुलाखतीला हजर राहू शकला नव्हता. त्यामुळे एमसीएच्या प्रशिक्षकपदाची निवड नेमक्या कोणत्या कारणास्तव पुढे ढकलण्यात आली आहे, हे सध्या तरी गुलदस्त्यात आहे.