मुंबई क्रिकेट असोसिएशनची (एमसीए) द्वैवार्षिक निवडणूक १० नोव्हेंबरला होणार आहे. एमसीएची निवडणूक जून महिन्यात होणे अपेक्षित होते. परंतु लोढा समितीच्या नव्या शिफारशींमुळे ती झाली नव्हती. आता सर्वोच्च न्यायालय भारतीय क्रिकेट नियामक मंडळासाठी (बीसीसीआय) नवी घटना लवकरच लागू करणार आहे. त्यानंतर राज्य संघटनांसाठीही धोरण निश्चित करण्यात येईल, असे सूत्रांनी सांगितले.

एमसीएची मागील निवडणूक २०१५मध्ये झाली होती. त्या वेळी  राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार अध्यक्षपदावर विराजमान झाले होते. लोढा समितीच्या शिफारशीनुसार पदाधिकाऱ्याचे वय ७० वर्षांच्या पुढे नसावे, असे स्पष्ट करण्यात आल्यावर पवार यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. मग भाजप नेते आशिष शेलार यांची अध्यक्षपदावर नियुक्ती करण्यात आली होती.

पुढील वर्षी जानेवारी महिन्यात मुंबई प्रीमियर लीग सुरू करण्यात येणार आहे, यावरही एमसीएच्या कार्यकारिणी समितीमध्ये शिक्कामोर्तब झाले.