मुंबई क्रिकेट असोसिएशनची वयचोरीबाबत भूमिका; पोलिसांकडे पाच खेळाडूंची बनावट कागदपत्रे सुपूर्द

वयचोरीच्या बऱ्याच तक्रारी येत असताना मुंबई क्रिकेट असोसिएशन (एमसीए) नेमके कोणते पाऊल उचलते, याकडे साऱ्यांचेच लक्ष लागले होते. वर्षभरात आलेल्या तक्रारींची शहानिशा करत वयचोरी प्रकरणात ५-६ मुले दोषी आढळली असून त्यांची तक्रार एमसीएने पोलिसांकडे केली आहे. या मुलांची सर्व कागदपत्रे पोलिसांना सुपूर्द करण्याचा निर्णय बुधवारी झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत घेण्यात आला. या निर्णयाने ‘गुणवत्ता असेल तर नियमही पाळा’ अशी भूमिका वयचोरीबाबत एमसीएने घेतली आहे.

या वर्षभरात वयचोरीच्या जवळपास ८०-८५ तक्रारी एमसीएकडे आल्या होत्या. या सर्व तक्रारींनंतर एमसीएने मुलांच्या कागदपत्रांची छाननी केली. यामधील २५-३० मुलांची कागदपत्रे योग्य असल्याचे निदर्श्नास आले आहे. पण ५-६ सहा जणांची कागदपत्रे खोटी असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्याचबरोबर ७-८ मुलांच्या कागदपत्रांची छाननी करावी अशी मागणी एमसीएने बृहन्मुंबई महानगरपालिकेकडे केली आहे. या छाननीनंतर जी मुले दोषी आढळतील त्यांची तक्रार एमसीए पोलिसांकडे करणार आहे.

वयचोरी प्रकरण एमसीएला नवीन नाही, पण शांळाची आणि त्यांच्याशी निगडित असलेल्या संस्थांची मते हिरावली जाऊ नयेत, म्हणून याबाबत ठोस पाऊल उचलले जात नव्हते. पण विद्यमान कार्यकारिणीने या मुद्दय़ावर कडक पावले उचलली असून यापुढे कोणतीही चुकीची गोष्ट करण्यासाठी मुलं, पालक, शाळा, प्रशिक्षक धजावणार नाहीत.

वयचोरीबरोबरच पत्ता बदलल्याची माहिती बरीच मुले एमसीएला कळवत नाहीत. त्यामुळे काही स्पर्धामध्ये खेळताना जर दुसऱ्या विभागातील मुलगा आढळला तर त्या संघाला सामना खेळायला दिला जात नाही. एका मुलाच्या चुकीमुळे संघातील अन्य दहा मुलांबरोबर संघाचेही नुकसान होते. त्याचबरोबर आपल्या मूळ पत्त्याच्या जागी न खेळता दुसऱ्या ठिकाणी जाऊन मुले खेळतात, त्यांच्यामुळे काही निरागस मुलांचे नुकसान होत आहे. त्यामुळे या गोष्टींवरही तोडगा काढला असून दोषी मुलांवरही योग्य ती कारवाई करण्याचा मानस एमसीएकडून व्यक्त केला जात आहे.

वयचोरी ही क्रिकेटला लागलेली कीड आहे. क्रिकेटमधून या गोष्टींचे निर्मूलन व्हायलाच हवे. पूर्वी काही हेतू साधण्यासाठी कारवाई केली जात नव्हती. पण आता एमसीएने उचललेले पाऊल कौतुकास्पद आहे. काही ठरावीक शाळा आणि प्रशिक्षक या गोष्टी बेमालूमपणे करतात, त्यांना या निर्णयाने चाप बसेल. काही प्रशिक्षकांना आपला संघ जिंकावा, असे वाटते. पण त्यापूर्वी खेळाडूंचा विकास होणे महत्त्वाचे आहे, हे ते विसरतात आणि अशा वाईट गोष्टी घडतात. मुलांबरोबर दोषी शाळांबरोबर प्रशिक्षकांवरही कारवाई करणे गरजेचे आहे.  संगम लाड, क्रिकेट प्रशिक्षक

क्रिकेट हा सभ्य माणसांचा खेळ आहे, असे म्हटले जाते. पण या वयचोरीमध्ये लहानपणापासूनच मुले चुकीची पावले उचलतात. प्रत्येक वेळी मुलेच दोषी नसतात, तर त्यांचे पालक, शाळा आणि प्रशिक्षकांचाही यामध्ये समावेश असतो. त्यामुळे जो दोषी आढळेल त्याच्यावर कडक कारवाई करण्याचा आमचा हेतू आहे. त्यामुळेच जी मुले या वयचोरी प्रकरणात दोषी आढळली आहेत, त्यांची तक्रार आम्ही पोलिसांकडे केली आहे. या साऱ्या गोष्टींच्या माध्यमांतून खेळात कोणतीही चुकीची गोष्ट घडू नये, असे आम्हाला वाटते आणि त्यासाठीच आम्ही कटिबद्ध आहोत. डॉ. उन्मेश खानविलकर, एमसीएचे सचिव