मुंबई क्रिकेट असोसिएशनची आज वार्षिक सर्वसाधारण सभा
भारतीय क्रिकेट नियामक मंडळासाठी (बीसीसीआय) लोढा समितीने सुचवलेल्या शिफारसी राबवण्याबाबत चर्चेचा प्रस्ताव मुंबई क्रिकेट असोसिएशनने (एमसीए) फेटाळला आहे. शुक्रवारी होणाऱ्या एमसीएच्या वार्षिक सर्वसाधारण सभेसाठी दोन संलग्न संस्थांनी याबाबत प्रस्तावाचे पत्र दिले होते.
बीसीसीआय आणि अन्य राज्य संघटनांचा कारभार सुरळीत चालण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या लोढा समितीच्या शिफारशींचे मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या सर्वसाधारण सभेने स्वागत करावे. याचप्रमाणे लोढा समितीच्या सर्व सूचना आणि शिफारसी अमलात आणण्यासंदर्भात एमसीएची सर्वसाधारण सभा कार्यकारिणी समितीला निर्देशित करीत आहे, अशा प्रकारचा ठराव प्रस्तावित होता. ओरिएंटल क्रिकेट क्लबचे श्रीपाद हळबे यांचा हा ठराव प्रस्तावित होता, तर गौड सारस्वत क्रिकेट क्लबचे रवी मांद्रेकर यांनी अनुमोदन केले होते; परंतु एमसीएचे संयुक्त सचिव पी. व्ही. शेट्टी आणि उन्मेष खानविलकर यांनी हा प्रस्ताव फेटाळून लावला.
प्रशासनात पारदर्शकता आणि आचारसंहिता असावी, या हेतूने लोढा समितीने केलेल्या शिफारशींबाबत एमसीएच्या कार्यकारिणी समितीच्या बैठकीत चर्चा झाली आहे. यापैकी काही शिफारसी असोसिएशनच्या हिताच्या आड येतात, त्यामुळे त्यांचे संरक्षण करणे आवश्यक आहे. लोढा समितीच्या शिफारसींचा अहवाल आमच्याकडे अवलोकनासाठी पावण्यात आला होता. यासंदर्भात कार्यकारिणी समिती आणि विधि समितीने आपले मत बीसीसीआयला पाठवले आहे, असे एमसीएच्या सूत्रांनी सांगितले. शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली १३ जानेवारीला कार्यकारिणीची बैठक झाली होती.