कामगिरीचा आलेख उतरंडीला आलेल्या मुंबईने आपल्या घरच्याच मैदानात चौथ्या रणजी सामन्याच्या पहिल्याच दिवशी अडखळत सुरुवात केली. संघात परतलेला वसिम जाफर आणि अभिषेक नायर यांच्या अर्धशतकांच्या जोरावर मुंबईने बंगालविरुद्ध पहिल्या दिवसअखेर ७ बाद २६२ अशी मजल मारली. बंगालच्या लक्ष्मी रतन शुक्लाने मुंबईच्या चार फलंदाजांना तंबूत धाडत संघाला चांगली सुरुवात करून दिली.
पहिल्यांदा फलंदाजी करणाऱ्या मुंबईने दिवसाची सावध सुरुवात केली खरी, पण ३९ ते ४६ धावांमध्ये मुंबईने फॉर्मात असलेल्या हिकेन शाह (०) आणि कर्णधार रोहित शर्मा (१) यांच्यासह तीन बळी गमावले. या वेळी संकटमोचक वसिम जाफर आणि अभिषेक नायर यांनी चौथ्या विकेटसाठी १०४ धावांची भागीदारी रचत संघाला स्थैर्य मिळवून दिले. ही जोडी आता संघाला मोठी धावसंख्या उभारून देईल, असे वाटत असतानाच शुक्लाने वसिमला बाद करत मुंबईला जोरदार धक्का दिला. जाफरला १६ धावांवर जीवदान मिळाले होते. त्याचा फायदा त्याने उचलला खरा, पण २००५साली दुलिप करंडकात सरावाविना दक्षिण विभागाविरुद्ध खेळताना त्याने शतक झळकावले होते, तो पराक्रम मात्र त्याला या वेळी करता आला नाही. डाव्या बाजूला फटका मारण्याच्या नादात चेंडूने वसिमच्या बॅटची कड घेतली आणि ‘शॉर्ट कव्हर्स’ला झेल देऊन तो तंबूत परतला, त्याने १५१ चेंडूंत १४ चौकारांनिशी ८० धावा केल्या. त्यानंतर काही वेळातच नायरही ६२ धावांवर त्रिफळाचीत झाला आणि मुंबई पुन्हा एकदा चहापानापूर्वी संकटात सापडली. या वेळी आदित्य तरे (३८) आणि अंकित चव्हाण (३५) यांनी सहाव्या विकेटसाठी ५६ धावांची भागीदारी रचली खरी, पण हे दोघे मोठी धावसंख्या उभारण्यात अयशस्वी ठरले. दिवसअखेर धवल कुलकर्णी (खेळत आहे २४) आणि शून्यावर जीवदान मिळालेल्या रमेश पोवारने (खेळत आहे १) सावधपणे दिवस खेळून काढला. शुक्लाने या वेळी भेदक मारा करत जाफर, शाह, रोहित आणि अंकित यांना बाद करत संघासाठी मोलाची जबाबदारी बजावली.
संक्षिप्त धावफलक
मुंबई (पहिला डाव) : ९० षटकांत ७ बाद २६२ (वसिम जाफर ८०, अभिषेक नायर ६२; लक्ष्मी रतन शुक्ला ४/३५)