मुंबई हॉकी असोसिएशनतर्फे (एमएचए) १ सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या सुपर लीग हॉकी स्पध्रेतून मुंबईच्या तीन संघांनी माघार घेतली आहे. त्यामुळे केवळ दहाच संघांसह ही स्पर्धा एमएचएला खेळवावी लागणार आहे. युनियन बँक, आरसीएफ आणि महाराष्ट्र राज्य पोलीस या संघांनी माघार घेतल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले आहे. यापकी युनियन बँक आणि पोलिसांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे, तर आरसीएफने दोन दिवसांत चित्र स्पष्ट करू, असे सांगितले. मात्र या संघांकडून अधिकृत पत्र मिळाले नसल्याचे एमएचएने स्पष्ट केले.
या स्पध्रेत मुंबईबाहेरचे अधिक संघ खेळवण्यात येत असल्यामुळे स्थानिक संघांमध्ये नाराजी होती. तसेच बाहेरच्या संघाकडून दारुण पराभव पत्करावा लागत असल्यामुळे वरिष्ठांकडून विचारणा होत असल्यामुळे स्थानिक संघांनी हा पवित्रा घेतल्याचे बोलले जात आहे. मात्र, मदानाबाहेरील राजकारण खेळात आल्याचे एमएचएचे सचिव राम सिंग राठोड यांचे म्हणणे आहे. ते म्हणाले, ‘‘मुंबईच्या संघांची कामगिरी सुधरावी आणि त्यांचा स्तर उंचवावा याकरिता बाहेरच्या संघांना बोलवण्यात येते. त्यांच्याबरोबर खेळून मुंबईच्या खेळाडूंचा फायदा होणार आहे. त्यामुळे दारुण पराभवाचे कारण चुकीचे आहे. हॉकीचा विकास हे आमचे ध्येय आहे. जर स्थानिक संघ बाहेरील संघांशी बरोबरी करण्यात अपयशी होत असतील, तर त्यांनी सुधारणा करावी.  निवडणूक झाली तरी राजकारण सुरूच आहे.’’
आरसीएफचे रमेशन पिल्ले यांनी सांगितले की, ‘‘याबाबत आत्ताच काही सांगू शकत नाही. १-२ दिवसांत निर्णय कळवू.’’ पण दोन दिवसांवर स्पर्धा आली असताना निर्णय न घेऊन आयोजकांना कोंडीत पकडण्याची खेळी असल्याचे बोलले जात आहे.

आमच्या संघात युवकांचा भरणा आहे. उलट बाहेरील संघांमध्ये आजी-माजी भारतीय खेळाडू खेळतात. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध दारुण पराभव होतो. व्यवस्थापकांना उत्तर द्यावे लागते. याचा खेळाडूंच्या मानसिकतेवर परिणाम होत असल्यामुळे यंदा न खेळण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. ही मुंबईची लीग असूनही स्थानिक संघांची संख्या कमी आहे.
– दीपक जोशी, युनियन बँक

गतवर्षी आम्ही सुपर लीगमध्ये तळाला आलो होतो आणि नियमानुसार आता आम्हाला वरिष्ठ विभागामध्ये खेळावे लागणार आहे. त्यामुळे यंदा आम्ही सुपर लीग खेळू शकत नाही. खालच्या गटात खेळून कामगिरी सुधारण्याचे आमचे लक्ष्य आहे.
– प्रमोद साइ, महाराष्ट्र राज्य पोलीस