* सचिन, नायरची अर्धशतके
* दिवसअखेर मुंबई ६ बाद १९८
*  यादव आणि नझरचे प्रत्येकी दोन बळी

‘अंडरडॉग्ज’ समजल्या जाणाऱ्या सेनादलाच्या संघाला मुंबईचा संघ सहज पराभूत करेल, असे काही जणांना वाटत असले तरी उपांत्य फेरीच्या पहिल्या दिवशी मुंबईची ६ बाद १९८ अशी बिकट अवस्था झाली आहे. सचिन तेंडुलकर आणि भन्नाट फॉर्मात असलेला अभिषेक नायर यांनी अर्धशतके झळकावली असली तरी या दोघांपैकी एकालाही मोठी खेळी साकारता आली नाही.
नाणेफेक जिंकून मुंबईने फलंदाजीचा निर्णय घेतला आणि वातावरणाचा चांगलाच फायदा सेनादलाच्या गोलंदाजांनी उचलला. मुंबईच्या पहिल्या तीन फलंदाजांना अवघ्या २३ धावांमध्ये सेनादलाच्या गोलंदाजांनी गुंडाळले. या बिकट अवस्थेतून सचिन आणि नायर यांनी संघाला बाहेर काढले. सचिनने निशान सिंगच्या एका षटकात दोन ‘स्ट्रेट ड्राइव्ह’ आणि ‘ऑन ड्राइव्ह’ मारले. त्यापूर्वी त्याने नझरला अप्रतिम ‘कव्हर ड्राइव्ह’ मारला होता. उपाहाराच्या वेळी सचिन १९ धावांवर होता, पण उपाहारानंतर सचिनचा खेळ चांगलाच फुलला आणि त्याने अर्धशतकाला गवसणी घातली. अभिषेक सिन्हा या फिरकीपटूच्या पहिल्या चेंडूवर सचिनने षटकार ठोकला, तेव्हा सचिन अधिक आक्रमक होऊन पुन्हा एकदा शतकाच्या दिशेने कूच करेल, असे वाटले होते. पण त्यानंतरचाच चेंडू त्याच्यासाठी अखेरचा ठरला. मोठा फटका मारण्याच्या नादात सचिन नकुल वर्माला ‘मिड ऑन’ला सोपा झेल देऊन बाद झाला. सचिनने बाद होण्यापूर्वी १० चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर ५६ धावा केल्या. सचिन बाद झाल्यावर सामन्याची सारी सूत्रे नायरने आपल्या खांद्यावर घेतली. अर्धशतकी खेळी साकारत नायरने ८ चौकारांच्या मदतीने १६० चेंडूंत ७० धावांची खेळी साकारली. नायर बाद झाल्यावर मुंबईच्या संघाने खेळपट्टीवर नांगर टाकून फलंदाजी करण्याचे ठरवले. आदित्य तरेने यावेळी १२४ चेंडूंत तीन चौकारांच्या मदतीने नाबाद २६ धावांची खेळी साकारली, तर कर्णधार अजित आगरकरने ४६ चेंडूंत २ चौकारांच्या मदतीने नाबाद १७ धावांची खेळी साकारली. सेनादलाच्या सूरज यादव आणि शादाब नझर यांनी प्रत्येकी दोन बळी मिळवले.
संक्षिप्त धावफलक
मुंबई (पहिला डाव) : ७८ षटकांत ६ बाद १९८ (अभिषेक नायर ७०, सचिन तेंडुलकर ५६; सूरज यादव २/४२)
सौराष्ट्र ५ बाद २७४
राजकोट : कर्णधार जयदेव शाह, शेल्डन जॅकसन आणि सितांशू कोटक यांच्या अर्धशतकाच्या जोरावर सौराष्ट्र रणजी क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य फेरीच्या पहिल्या दिवशी ५ बाद २७४ अशी मजल मारली आहे. नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेणाऱ्या सौराष्ट्रची सुरुवात चांगली झाली नाही. पण शाह (८७) आणि कोटक (५४) यांनी तिसऱ्या विकेटसाठी ९२ धावांची भागीदारी रचत संघाला सावरले. हे दोघे बाद झाल्यावर जॅकसनने नाबाद ७० धावांची खेळी साकारत संघाला सन्मानजनक धावसंख्या उभारून दिली.