आदित्य तरेचे द्विशतक
रोहितची दीडशतकी खेळी
सौराष्ट्रची डळमळीत सुरुवात
यंदाच्या रणजी हंगामात पहिल्या विजयासाठी आतुर मुंबई संघाने सौराष्ट्रविरुद्ध विजयासाठी दमदार पायाभरणी केली. २ बाद ३०६ वरून खेळणाऱ्या मुंबईने आणखी तीनशे धावांची भर घातली आणि ५ बाद ६०६ धावांवर पहिला डाव घोषित केला. आदित्य तरेचे द्विशतक आणि भारतीय कसोटी संघात पुनरागमनासाठी उत्सुक असलेल्य रोहित शर्माने झळकावलेले आणखी एक शतक मुंबईच्या डावाचे वैशिष्टय़ ठरले. रोहित आणि तरे या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी केलेल्या २७८ धावांच्या भागीदारीमुळेच मुंबईला मोठी धावसंख्या उभारता आली. आदित्यने ३६९ मिनिटे खेळपट्टीवर ठाण मांडत ३१ चौकार आणि एका षटकारासह २२२ धावांची मॅरेथॉन खेळी केली. २५ वर्षीय आदित्यचे प्रथम श्रेणी क्रिकेटमधील हे पहिलेच शतक ठरले. यंदाच्या हंगामात जबरदस्त फॉर्मात असलेल्या रोहित शर्माने १६ चौकार आणि ४ षटकारांसह १६६ धावांची आक्रमक खेळी केली. रोहितचे हे प्रथम श्रेणी क्रिकेटमधील १५वे शतक. कमलेश मकवानाने आदित्यला बाद करत ही जोडी फोडली. अभिषेक नायरने नाबाद ६९ धावा केल्या. मुंबईने आपला डाव ५ बाद ६०६ वर आपला डाव घोषित केला. मुंबईचा कर्णधार आणि अनुभवी गोलंदाज अजित आगरकरने भूषण चौहानला झटपट बाद करत सौराष्ट्रला धक्का दिला. यापाठोपाठ
धवल कुलकर्णीने सागर जोगियानीला तरेकडे झेल द्यायला भाग पाडले. दुसऱ्या दिवसअखेर सौराष्ट्रच्या २ बाद ४२ झाल्या असून ते ५६४ धावांनी पिछाडीवर आहेत.
 संक्षिप्त धावफलक
मुंबई (पहिला डाव) : ५ बाद ६०६ डाव घोषित (आदित्य तरे २२२, रोहित शर्मा १६६) वि. सौराष्ट्र पहिला डाव २ बाद  ४२ (जयदेव शाह नाबाद २८).