आज गुजरात लायन्सशी साखळीतील अखेरचा सामना
आयपीएलच्या नवव्या हंगामाची धुमश्चक्री आता अखेरच्या टप्प्यात येऊन ठेपली आहे. त्यामुळे सामन्यांमधील रंगत अधिकाधिक वाढली आहे. गतविजेत्या मुंबई इंडियन्सचा शनिवारी अखेरचा साखळी सामना गुजरात लायन्सविरुद्ध होणार आहे. बाद फेरीचे स्वप्न शाबूत राखण्यासाठी त्यांना विजयाशिवाय पर्याय नाही.
मुंबई इंडियन्सने १३ सामन्यांपैकी ७ विजय मिळवले असून, एकंदर १४ गुणांसह ते आयपीएल गुणतालिकेत पाचव्या स्थानावर आहेत. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि कोलकाता नाइट रायडर्स यांच्या खात्यावरसुद्धा तितकेच गुण असून, निव्वळ धावगतीच्या बळावर ते अनुक्रमे तिसऱ्या आणि चौथ्या स्थानावर आहेत.
वानखेडेवर गेल्या महिन्यात गुजरातने मुंबईला हरवले होते, त्या पराभवाचे उट्टे फेडण्याचा निर्धार मुंबईने केला आहे. मात्र या सामन्यात ते हरले, तर त्यांचे स्पध्रेतील आव्हान संपुष्टात येऊ शकेल. गुजरातचा संघ गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर असून, त्यांच्या खात्यावर १३ सामन्यांत १६ गुण जमा आहेत. त्यामुळे मुंबईविरुद्ध विजयासह ते बाद फेरी गाठू शकतात.
दिल्ली डेअरडेव्हिल्सविरुद्ध १५ मे रोजी झालेल्या सामन्यात ८० धावांनी मिळवलेल्या दणदणीत विजयामुळे मुंबईचा आत्मविश्वास दुणावला आहे. सातत्यपूर्ण धावा काढणाऱ्या कर्णधार रोहित शर्मा आणि अंबाती रायुडू यांच्यावर मुंबईच्या फलंदाजीची भिस्त आहे. युवा अष्टपैलू खेळाडू कृणाल पंडय़ाने दिल्लीविरुद्धच्या सामन्यात ३७ चेंडूंत ८६ धावांची वेगवान खेळी साकारली होती. याशिवाय जोस बटलर आणि किरॉन पोलार्डसारखे फलंदाज त्यांच्याकडे आहेत.
मिचेल मॅक्क्लिनॅघन मुंबईच्या वेगवान माऱ्याचे नेतृत्व करीत आहे. त्याने १३ सामन्यांत १७ बळी मिळवले असून, तो यंदाच्या हंगामात सर्वात जास्त बळी मिळवणाऱ्या गोलंदाजांच्या पंक्तीत आघाडीवर आहे. त्याला तोलामोलाची साथ देणाऱ्या जसप्रित बुमराहने १४ बळी मिळवले आहेत. मुंबईच्या फिरकी गोलंदाजांना आपला अपेक्षित रुबाब दाखवला आलेला नाही. हरभजनने ८ आणि पंडय़ाने ६ बळी आतापर्यंत मिळवले आहेत.
गुजरातने आपल्या पहिल्यावहिल्या हंगामाला दमदार प्रारंभ केला होता. मे महिन्याच्या अखेरीस त्यांची कामगिरी खालावली होती. बंगळुरूकडून त्यांनी १४४ धावांनी दारुण पराभव पत्करला होता. मात्र त्यातून सावरत बुधवारी त्यांनी कोलकाताला हरवले होते. संघनायक सुरेश रैनाने संघाला विजयश्री मिळवून देताना ३६ चेंडूंत ५३ धावा केल्या होत्या. याशिवाय बेंडन मॅक्क्युलम व ड्वेन स्मिथ यांच्यासारखे स्फोटक फलंदाज त्यांच्याकडे आहेत.
गोलंदाजीच्या विभागात ड्वेन ब्राव्हो आणि धवल कुलकर्णी यांच्यावर गुजरातची मदार असेल.