दिग्गज फलंदाजांचा भरणा असलेल्या रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघाला धूळ चारल्यानंतर गुजरात लायन्सचा आत्मविश्वास वाढला आहे. त्यामुळे शनिवारी आयपीएलमध्ये बलाढय़ मुंबई इंडियन्सला नमवून बादफेरीच्या दिशेने आगेकूच करण्यासाठी गुजरातचा संघ उत्सुक आहे.

कर्णधार सुरेश रैना दुखापतीतून सावरावा, हीच अपेक्षा सध्या गुजरातचा संघ करीत आहे. बेंगळुरूविरुद्धच्या सामन्यात रैनाने ३० चेंडूंत ३४ धावा केल्या, पण क्षेत्ररक्षण करताना त्याच्या खांद्याला दुखापत झाली होती. फलंदाजी करताना हे दुखणे स्पष्टपणे जाणवत होते. रैनाच्या खात्यावर सध्या ३०९ धावा जमा आहेत.

आयपीएल गुणतालिकेची तुलना करता दोन्ही संघांमध्ये तफावत आढळते. मुंबईने ८ पैकी ६ सामने जिंकले आहेत, तर गुजरातने ८ पैकी ३ सामनेच जिंकले आहेत. मुंबईने दोन्ही पराभव हे फक्त रायझिंग पुणे सुपरजायंट्सकडून पत्करले आहेत. त्यामुळे आणखी दोन विजयांसह बादफेरीचे स्थान निश्चित करण्याचे मनसुबे मुंबईने आखले आहेत. गुजरातसाठी मात्र बादफेरीचे आव्हान अधिक कठीण आहे. उर्वरित ६ पैकी ५ सामने जिंकल्यास त्यांचे बादफेरीचे स्वप्न पूर्ण होऊ शकते.

ड्वेन ब्राव्होच्या दुखापतीमुळे गुजरातच्या चिंतेत भर पडली आहे. मात्र जेम्स फॉकनर आणि अ‍ॅड्रय़ू टाय यांची वैविध्यपूर्ण गोलंदाजी तसेच बेंड्रन मॅक्क्युलम आणि आरोन फिंच यांची दिमाखदार फलंदाजी यावर गुजरातची प्रमुख मदार आहे. बसिल थाम्पीसारखी नवी गुणवत्ता गोलंदाजीत उदयास येत आहे. नथ्थू सिंगनेही चुणूक दाखवली आहे. मधल्या फळीत दिनेश कार्तिक आशादायी फटकेबाजी करीत आहेत.

दुसरीकडे गुणवत्तेची एकंदर तुलना केल्यास रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील मुंबईचा संघ अधिक ताकदवान म्हणता येईल. धडाकेबाज जोस बटलर, अनुभवी तारणहार किरॉन पोलार्ड मुंबईसाठी यशदायी ठरत आहेत. कृणाल आणि हार्दिक हे पंडय़ा बंधू विजयासाठी महत्त्वाचे योगदान देत आहेत. मिचेल जॉन्सन आणि मिचेल मॅक्क्लॅघन वेग आणि स्विंगच्या बळावर प्रतिस्पध्र्यावर अंकुश ठेवत आहेत. जसप्रित बुमराहसुद्धा जबाबदारीने गोलंदाजी करीत आहे. त्यामुळे सूर हरवलेल्या लसिथ मलिंगाला संघात स्थान मिळवण्याची शक्यता कमी आहे.

हरभजन सिंगची फिरकी, हे मुंबईचे बलस्थान. आतापर्यंत त्याने ७ सामन्यांत ५.८८च्या सरासरीने २६ षटके टाकली आहेत. त्याच्या खात्यावर फक्त ४ बळी जमा असले तरी तो प्रतिस्पर्धी फलंदाजांना चांगलाच जखडून ठेवत आहे.