सलग सहा विजयांनंतर मुंबई इंडियन्सचा संघ सज्ज झाला आहे तो या हंगामातील एकमेव पराभवाचा वचपा काढण्यासाठी. हंगामातील पहिल्या सामन्यात मुंबईला रायझिंग पुणे सुपरजायंट्स संघाकडून पराभव स्वीकारावा लागला होता. सोमवारी आपल्या घरच्या वानखेडे स्टेडियमवर मुंबईचा संघ पुण्याला नामोहरम करण्यासाठी आसुसलेला आहे. त्यामुळे महाराष्ट्राचा हा महासंग्राम रंजक होईल, अशी आशा क्रिकेट रसिकांना आहे.

मुंबईचा संघ सध्या कमालीच्या फॉर्मात आहे. गेल्या सामन्यात मुंबईच्या गोलंदाजांनी दिल्ली डेअरडेव्हिल्सची दैना उडवली होती. वेगवान गोलंदाज मिचेल मॅक्लेघन हा भन्नाट फॉर्मात आहे. त्याला जसप्रीत बुमराह आणि मिचेल जॉन्सन यांच्याकडून चांगली साथ मिळत आहे. त्यामुळे मुंबईची गोलंदाजी अधिक भेदक झाली आहे. गेल्या सामन्यात मुंबईच्या फलंदाजांना चमक दाखवता आली नसली तरी त्यापूर्वीच्या सामन्यात मुंबईने जवळपास १६ षटकांमध्ये १९८ धावा केल्या होत्या. जोस बटलर हा फलंदाजीमध्ये मुंबईचा आधारस्तंभ आहे. नितीश राणा सातत्याने धावा करत आहे. किरॉन पोलार्डचीही फलंदाजीमध्ये चांगली साथ मिळत आहे. पण कर्णधार रोहित शर्माच्या बॅटमधून धावा निघत नसून मुंबईसाठी ही चिंतेची बाब आहे.

पुण्याने सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यात विजय मिळवला होता. या सामन्यात महेंद्रसिंग धोनी हा फॉर्मात आला. त्यामुळे पुण्यासाठी ही फार सकारात्मक गोष्ट असेल. कर्णधार स्टीव्ह स्मिथसारखा आक्रमक आणि अजिंक्य रहाणेसारखा तंत्रशुद्ध आणि शैलीदार फलंदाज पुण्याच्या संघात आहे. गेल्या सामन्यात सलामीवीर राहुल त्रिपाठीने अर्धशतक झळकावत आपली निवड सार्थ ठरवली होती. बेन स्टोक्स आपल्या अष्टपैलुत्वाची चमक दाखवण्यासाठी उत्सुक आहे.  मुंबई आणि पुणे या सामन्याशी महाराष्ट्रातल्या लोकांचे भावनिक नाते आहे. त्यामुळे हा सामना पाहण्यासाठी सारेच आतुर असतील. हा सामना जिंकून हंगामातील वर्चस्व कायम राखण्यासाठी पुण्याचा संघ प्रयत्नशील असेल. तर विजयी घोडदौड कायम ठेवत पराभवाची परतफेड करण्यासाठी मुंबईचा संघ उत्सुक असेल.

संभाव्य संघ

मुंबई इंडियन्स : रोहित शर्मा (कर्णधार), हरभजन सिंग, श्रेयस गोपाळ, जसप्रीत बुमराह, हार्दिक पंडय़ा, कृणाल पंडय़ा, कृष्णप्पा गौतम, कुलवंत खेजरोलिया, सिद्धेश लाड, पार्थिव पटेल, दीपक पुनिया, नितीश राणा, अंबाती रायुडू, जितेश शर्मा, करण शर्मा, सौरभ तिवारी, जगदीश सुचित, विनय कुमार, टीम साऊदी, लेंडल सिमन्स, निकोलस पूरन, कीरेन पोलार्ड, मिचेल मॅक्लेघान, लसिथ मलिंगा, मिचेल जॉन्सन, असेला गुणरत्ने, जोस बटलर.

रायझिंग पुणे सुपरजायंट्स : स्टीव्हन स्मिथ (कर्णधार), महेंद्रसिंग धोनी, मयांक अगरवाल, अंकित शर्मा, बाबा अपराजित, अंकुश बैन्स, रजत भाटिया, दीपक चहार, राहुल चहार, अशोक दिंडा, जसकरण सिंग, अजिंक्य रहाणे, सौरभ कुमार, मिलिंद टंडन, मनोज तिवारी, जयदेव उनाडकत, अ‍ॅडम झंपा, बेन स्टोक्स, उस्मान ख्वाजा, लॉकी फग्र्युसन, फॅफ डू प्लेसिस.