आठवडय़ाभराच्या विश्रांतीनंतर परतलेल्या मुंबई इंडियन्सला आपली विजयी घोडदौड कायम राखायची असेल, तर रविवारी सनरायझर्स हैदराबादला नमवणे क्रमप्राप्त आहे. किंग्ज ईलेव्हन पंजाब, कोलकाता नाइट रायडर्स आणि रायझिंग पुणे सुपरजायंट्स या संघांविरुद्ध सलग तीन विजय नोंदवणाऱ्या मुंबईला आयपीएलच्या भरगच्च वेळापत्रकात काही दिवसांची विश्रांती मिळाली होती. तर शुक्रवारी रात्री हैदराबादने गुजरात लायन्सला हरवण्याची किमया साधली होती. त्यामुळे मुंबईहून विशाखापट्टणम् या नव्या शहरात डेरेदाखल झालेल्या मुंबई इंडियन्ससाठी डॉ. वाय. एस. राजशेखर रेड्डी क्रिकेट स्टेडियम यशदायी ठरणार का, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
आयपीएलच्या गुणतालिकेत हैदराबाद आणि मुंबई हे दोन्ही संघ मध्यावर असून, दोघांच्याही खात्यांवर प्रत्येकी १० गुण जमा आहेत. अनुक्रमे ८ आणि ९ सामने खेळणाऱ्या या दोन्ही संघांनी प्रत्येकी पाच सामने जिंकले आहेत. हे दोन्ही संघ यंदाच्या हंगामात १८ एप्रिलला एकमेकांशी लढले होते. तो सामना हैदराबादने सात विकेट्स आणि १५ चेंडू राखून जिंकला होता. त्या पराभवाचे उट्टे फेडण्याचे आव्हान मुंबईसमोर असेल.
सामन्याची वेळ : दुपारी ४ वाजल्यापासून.
थेट प्रक्षेपण : सोनी सिक्स आणि सेट मॅक्सवर