आंध्र प्रदेशला तीन गुण

सिद्धेश लाडच्या दमदार अर्धशतकाच्या जोरावर मुंबईने पहिल्या डावात आंध्र प्रदेशला तोडीस तोड देण्याचा प्रयत्न केला असला तरी त्यांना पहिल्या डावातील आघाडी घेण्याची संधी गमावली. सिद्धेशच्या अर्धशतकाच्या जोरावर मुबंईने पहिल्या डावात २३७ धावा केल्या आणि फक्त सात धावांनी आघाडी मिळवण्याचे स्वप्न धुळीस मिळाले. सामना अनिर्णीत राहिला असला तरी आंध्र प्रदेशने पहिल्या डावातील आघाडीच्या जोरावर तीन गुण कमावले असून मुंबईला फक्त एका गुणावर समाधान मानावे लागले आहे.

चौथ्या दिवसाची सिद्धेश आणि अभिषेक नायर (२३) यांनी संयत सुरुवात केल्यावर मुंबई पहिल्या डावात आघाडी मिळवेल, असे दिसत होते; पण अभिषेक धावचीत झाल्यावर सारी जबाबदारी सिद्धेशने आपल्या खांद्यावर घेतली, पण अन्य फलंदाजांची अपेक्षित साथ न लाभल्याने मुंबईला पहिल्या डावातील आघाडीची संधी गमवावी लागली. सिद्धेशने १२ चौकार आणि एका चौकाराच्या जोरावर ८६ धावांची खेळी साकारली. बंदारू अयप्पाने या वेळी सहा मुंबईच्या फलंदाजांना बाद करण्याची किमया साधली. दुसऱ्या डावात आंध्र प्रदेशने दमदार फलंदाजी करत चौथ्या दिवसअखेपर्यंत ३ बाद १७६ अशी मजल मारली होती.

संक्षिप्त धावफलक

आंध्र प्रदेश : २४४ आणि ६५ षटकांत ३ बाद १७६ (प्रशांत कुमार ५९, मैहम्मद कैफ नाबाद ४९; विशाल दाभोळकर २/२६)

मुंबई (पहिला डाव) : ९१.५ षटकांत सर्वबाद २३७ (सिद्धेश लाड ८६; बंदारु अयप्पा ६/७१).

गुण : आंध्र प्रदेश ३, मुंबई १.