चेन्नईत-तामिळनाडूकडून डावाने पराभव पत्करल्यामुळे मुंबई क्रिकेट संघाला रणजी क्रिकेट स्पध्रेतील आव्हान टिकवणे आता कठीण झाले आहे. सहा सामन्यांत मुंबईच्या खात्यावर जेमतेम ११ गुण जमा आहेत. मुंबई क्रिकेटच्या सध्याच्या खराब कामगिरीची दखल घेऊन क्रिकेट सुधार समितीचे पुनरुज्जीवन करण्याचा निर्णय घेण्यात आला. बाकी मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या शुक्रवारी झालेल्या ८१व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत सुमारे पावणेदोन तास प्रामुख्याने सदस्य, सदस्यत्व, सामन्यांच्या तिकिट्स आणि एकमेकांची उणीदुणी काढण्यातच धन्यता मानण्यात आली.
‘‘क्रिकेट सुधार समितीमध्ये माधव आपटे, अजित वाडेकर, विनोद कांबळी, अजित आगरकर आणि मिलिंद रेगे यांचा समावेश असेल. क्रिकेटच्या विकासासाठीचे कोणतेही महत्त्वाचे निर्णय ही समिती स्वतंत्रपणे घेईल,’’ असे एमसीएचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितले.
‘‘एमसीएच्या निवडणुकीसाठी महत्त्वाच्या पदांकरिता चार आणि कार्यकारिणी सदस्य पदासाठी दोन वार्षिक सर्वसाधारण सभांना हजेरी लावणे क्रमप्राप्त आहे, या विषयावर बैठकीत खमंग चर्चा झाली. योग्य आढावा घेतल्यावर याबाबत कार्यकारिणी समिती निर्णय घेईल आणि गरज वाटल्यास विशेष सर्वसाधारण सभेत याबाबत चर्चा होईल,’’ असे पवार यांनी सांगितले. ‘‘मैदानाचे भाडे आणि मुदतवाढ यासंदर्भातील प्रश्नांवर मुख्यमंत्री, पालिका अधिकारी यांच्याशी उच्चस्तरीय चर्चा करून मार्ग काढण्यात येईल,’’ असे आश्वासन या वेळी पवार यांनी दिले.
ते पुढे म्हणाले, ‘‘एमसीएच्या कारभारातील पारदर्शकता जपण्यासाठी वार्षिक अहवाल आणि लेखापरीक्षा अहवाल बीसीसीआयप्रमाणेच वेबसाइटवर उपलब्ध करण्यात येईल.’’

बीसीसीआय निवडणुकीसंदर्भात शरद पवारांचे मौन
एन. श्रीनिवासन यांना सर्वोच्च न्यायालयाने दणका दिल्यानंतर आता शरद पवार बीसीसीआयच्या अध्यक्षपदासाठी मोर्चेबांधणी करणार, अशी क्रिकेट वर्तुळात जोरदार चर्चा होती. परंतु या प्रश्नाला उत्तर देण्याऐवजी पवार यांनी मौन पाळणेच पसंत केले.