खडूस क्रिकेटसाठी ओळखल्या जाणाऱ्या मुंबईच्या खेळाडूंनी उत्तर प्रदेशविरुद्ध या चिवट वृत्तीचा प्रत्यय दिला. श्रेयस अय्यर, शार्दुल ठाकूर आणि क्षेमल वायंगणकर या तळाच्या फलंदाजांनी दिलेल्या योगदानामुळे मुंबईला उत्तर प्रदेशविरुद्ध छोटी पण निर्णायक आघाडी मिळाली.
उत्तर प्रदेशात आलेल्या थंडीच्या लाटेत उत्तर प्रदेशच्या २०६ धावांसमोर खेळताना तिसऱ्या दिवशी मुंबईने ३ बाद ४२ वरून पुढे खेळायला सुरुवात केली.
खराब फॉर्मशी झुंजणाऱ्या मधल्या फळीतील फलंदाजांनी पुन्हा एकदा नांगी टाकली. हिकेन शाह कालच्या धावसंख्येत सहा धावांची भर घालून २० धावांवर बाद झाला. कर्णधार सूर्यकुमार यादवला केवळ दोन धावा करता आल्या.
इंडियन प्रीमिअर लीग स्पर्धेत धावांची टांकसाळ उघडणारा आदित्य तरे चार धावा करून तंबूत परतला. मात्र यानंतर श्रेयस अय्यरने एका बाजूने किल्ला लढवत मुंबईचा डाव सावरला. विल्किन मोटाने १४ धावा करत त्याला साथ देण्याचा प्रयत्न केला. मात्र अनुभवी प्रवीण कुमारने त्याला माघारी धाडले. मोटानंतर श्रेयसला साथ मिळाली ती शार्दुल ठाकूरची. या दोघांनी आठव्या विकेटसाठी ५० धावांची भागीदारी केली.
शतकाकडे कूच करणाऱ्या श्रेयसला अमित मिश्राने बाद केले. श्रेयसने ११ चौकारांसह ७८ चेंडूंत ७५ धावांची खेळी केली. शार्दुलने क्षेमल वायंगणकरसह नवव्या विकेटसाठी ९७ धावांची भागीदारी करत मुंबईला महत्त्वपूर्ण आघाडी मिळवून दिली. शार्दुलचे शतकाचे स्वप्न पूर्ण होऊ शकले नाही.
पीयूष चावलाने शार्दुलला बाद केले. शार्दुलने १३ चौकारांसह ८७ धावांची खेळी साकारली. क्षेमलने नाबाद ३१ धावांची खेळी केली. या तिघांच्या योगदानामुळे मुंबईला पहिल्या डावात ६४ धावांची छोटी, मात्र महत्त्वपूर्ण आघाडी मिळाली. उत्तर प्रदेशतर्फे अमित मिश्राने ४ तर प्रवीण कुमारने ३ बळी घेतले.
दुसऱ्या डावात उत्तर प्रदेशने बिनबाद ७ अशी मजल मारली आहे. उत्तर प्रदेशचा संघ अजूनही ५७ धावांनी पिछाडीवर आहे.