धावणे हा मुंबईचा स्थायीभाव. कामाच्या निमित्ताने रोज भागम्भाग करणाऱ्या मुंबई नगरीत रविवार म्हणजे k08विश्रांतीवार; परंतु नवीन वर्षांतल्या तिसऱ्या रविवारी धावण्याला निमित्त लाभते स्पर्धेचे आणि उत्साहाचे. मुंबईकरांच्या आयुष्याचा अविभाज्य घटक झालेली मुंबई मॅरेथॉन शर्यत रविवारी एक तप साजरे करणार आहे.
बीजिंग (चीन) येथे ऑगस्टमध्ये होणाऱ्या जागतिक अजिंक्यपद शर्यतीसाठी निवड चाचणी म्हणून ही शर्यत होणार असल्याने व्यावसायिक शर्यतपटूंमधील चुरस वाढली आहे. लंडन ऑलिम्पिकपटू रामसिंग यादव मुंबई मॅरेथॉनमध्ये परतल्याने गतविजेता करण सिंगसाठी अव्वल स्थान मिळवणे खडतर झाले आहे. महिलांमध्ये सातारकर आणि आशियाई कांस्यपदक विजेती ललिता बाबर जेतेपदाची प्रबळ दावेदार आहे. २०१० मध्ये आशियाई सुवर्णपदक विजेती सुधा सिंग ललिताच्या मार्गातला अडथळा ठरू शकते. आशियाई क्रीडा स्पर्धेत कांस्यपदक विजेती ओ.पी. जैशा पहिल्याच मुंबई मॅरेथॉनमध्ये दमदार पदार्पणासाठी उत्सुक आहे. महाराष्ट्राची विजयमाला पाटील अव्वल तीनमध्ये स्थान पटकावण्यासाठी आतुर आहे. ‘सावरपाडा एक्स्प्रेस’ कविता राऊतच्या कामगिरीकडे सर्वाचे लक्ष असणार आहे.k09