१८ सेकंदांच्या फरकाने केनियाच्या जोशुआला मागे टाकले

मुंबईतील तापमानाचा लहरी स्वभाव मुंबईकरांना नवखा नाही, परंतु मुंबई मॅरेथॉन स्पध्रेसाठी दाखल झालेल्या आंतरराष्ट्रीय धावपटूंना पहिल्यांदाच याची प्रचीती आली. दोन दिवसांपूर्वी हुडहुडी भरवणाऱ्या गारव्यामुळे मुंबई मॅरेथॉनमध्ये नव्या स्पर्धा विक्रमाची नोंद करण्याचा दावा करणाऱ्या धावपटूंना अव्वल तिघांमध्येही स्थान पटकावता आले नाही. पूर्ण मॅरेथॉनच्या आंतरराष्ट्रीय गटात टांझानियाच्या अल्फोन्से सिम्बूने अनपेक्षित कामगिरी करत जेतेपदाला गवसणी घातली.

४० किलो मीटपर्यंतच्या शर्यतीत काही सेकंदांच्या फरकाने आघाडीवर असलेल्या केनियाच्या जोशुआ किप्कोरीरला १८ सेकंदांने मागे टाकत सिम्बूने बाजी मारली. सिम्बूने आतापर्यंतची सर्वोत्तम अशी २ तास ०९ मिनिटे ३२ सेकंदांची वेळ नोंदवली. किप्कोरीरने (२:०९:५० से.) दुसरे, तर केनियाच्या एलिऊड बाग्र्नेटूनीने (२:१०:३९) तिसरे स्थान पटकावले.

छत्रपती शिवाजी टर्मिनल्स येथून रविवारी सकाळी ७.२० वाजता सुरू झालेल्या पूर्ण मॅरेथॉनमध्ये युगांडाचा एझेकिएल चेप्कोरोम, केनियाचे मिचेल मुताई व जेकब केंडागोर यांनी आघाडी घेतली होती. हवेत किंचितशा जाणवणाऱ्या गारव्याचा फायदा घेत सर्वच स्पर्धकांमध्ये आघाडी घेण्यासाठी चढाओढ पाहायला मिळाली, परंतु चेप्कोरोम, मुताई व केंडोगोर या त्रिकुटाने सर्वाना पिछाडीवर ठेवत पहिल्या १६ किलोमीटपर्यंत आघाडी कायम राखली. केनियाचा लेव्ही मॅटेबो अचानक या आघाडीत समाविष्ट झाला. जेतेपदाचा प्रबळ दावेदार असलेल्या लेव्हीकडून येथे नवा स्पर्धा विक्रम नोंदवण्याची अपेक्षा होती. त्याने त्या दृष्टीने गती वाढवत ३२ किमीपर्यंत निर्विवाद वर्चस्व गाजवले. किप्कोरीर आणि केनियाचा जेकब चेसरी यांनीही लेव्हीसह अव्वल तिघांमध्ये स्थान निश्चित करताना शर्यतीत रंजकता निर्माण केली. हाजी अलीपर्यंत लेव्ही पिछाडीवर गेला आणि इथिओपियाच्या डिडा बोन्साने अव्वल चौघांत स्थान पटकावले. जेतेपदाच्या प्रबळ दावेदारांपैकी एक असलेला सेबोको दिबाबाचे अस्तित्व जाणवत नव्हते.

अंतिम रेषा जसजशी जवळ येत होती, तसतसे हे चित्र सातत्याने बदलताना पाहायला मिळाले. बाबुलनाथ मंदिरानंतर मात्र शर्यतीचा निकाल जवळपास स्पष्ट दिसत होता. सिम्बू आणि किप्कोरीर यांनी गती वाढवत उर्वरित स्पर्धकांना खूप मागे टाकले. आघाडीवर असलेल्या किप्कोरीरने चतुराईने खेळ करताना सिम्बूला दुसऱ्या क्रमांकावर ठेवण्यात अखेरच्या क्षणापर्यंत यश मिळवले होते. मात्र सिम्बूने हुतात्मा स्मारकानंतर आघाडी घेत अवघ्या १८ सेकंदांच्या फरकाने बाजी मारली.

‘‘ही शर्यत आव्हानात्मक होती. या पहिल्यांदाच सहभाग घेत असलो, तरी येथील भौगोलिक रचनेबाबत जाणून घेतले होते. त्यामुळे आव्हानांसाठी सज्ज होतो,’’ अशी प्रतिक्रिया सिम्बूने दिली. मात्र दुसऱ्या क्रमांकावर आलेल्या किप्कोरीरने नाराजी व्यक्त केली. तो म्हणाला, ‘‘स्पर्धा मार्गात अनेक अडचणींना सामना करावा लागला. वळणांच्या वाढलेल्या प्रमाणांमुळे वेळेवर परिणाम झाला. शर्यतपटूंसाठी ठेवण्यात आलेल्या पाण्याची व्यवस्थाही योग्य नव्हती. त्यामुळे माझ्यासाठी ठेवलेली पाण्याची बाटली नेमकी कोणती तेच ओळखता येत नव्हते.’’

महिलांमध्ये केनियाची बोर्नेस किटूर अव्वल

केनियाची बोर्नेस किटूर आणि इथिओपियाची चॅल्टू टाफा यांच्यात रंगलेल्या युद्धात किटूरने २ तास २९ मिनिटे ०२ सेकंदांची वेळ नोंदवून बाजी मारली. दोन वेळा मुंबई मॅरेथॉन जिंकणाऱ्या इथिओपियाच्या दिन्केंश मेकाशला पाचव्या स्थानावर समाधान मानावे लागले. टाफाने २ तास ३३ मिनिटे ०३ सेकंदांसह दुसरे, तर इथिओपियाच्याच टिगिस्ट गिर्माने २ तास ३३ मिनिटे १९ सेकंदांसह तिसरे स्थान पटकावले. अव्वल आलेल्या तिन्ही धावपटूंनी स्पर्धा आयोजनावर नाराजी व्यक्त केली. हौशी धावपटूंनी मार्गात अनेकदा अडथळा निर्माण केला आणि प्रोत्साहन देणारे चाहतेही मार्गात उभे असल्यामुळे शीतपेयासाठी उभारण्यात आलेले स्टॉल्स आम्हाला दिसत नव्हते. त्याचा संपूर्ण परिणाम कामगिरीवर झाला, अशी तक्रार या धावपटूंनी केली.

अर्ध मॅरेथॉनमध्ये कोल्हापूरकर सरस

अर्ध मॅरेथॉनमध्ये मीनाक्षी पाटील, सचिन पाटील आणि दीपक कुंभार या कोल्हापूरच्या धावपटूंनी सरस कामगिरी करताना आपापल्या गटात अव्वल तिघांमध्ये स्थान पटकावले. महिला गटात नाशिकच्या मोनिका आथरेने दिल्लीपाठोपाठ मुंबई अर्ध मॅरेथॉनमध्ये जेतेपद नावावर केले. मोनिकाने १ तास १९ मिनिटे १३ सेकंदांत शर्यत पूर्ण करून प्रथम क्रमांक पटकावला. ती म्हणाली, ‘‘यंदा पूर्ण मॅरेथॉनमध्ये सहभाग घेण्यासाठी प्रयत्नशील होते, परंतु त्यासाठी पूर्णपणे सज्ज नसल्यामुळे अर्ध मॅरेथॉनमध्येच धावली. फेब्रुवारीत होणाऱ्या राष्ट्रीय स्पध्रेत वेळेत सुधारणा करून पूर्ण मॅरेथॉनमध्ये सहभागी होण्याचा प्रयत्न असेल.’’ कोल्हापूरच्या मीनाक्षी पाटीलने (१:२०:५३ से.) दुसरे, तर अनुराधा सिंगने (१:२५:२० से.) तिसरे स्थान निश्चित केले. पुरुष गटात गतविजेत्या दीपक कुंभारला मागे टाकत लक्ष्मणन जी. आणि सचिन पाटील यांनी अनुक्रमे पहिले व दुसरे स्थान पटकावले. १० किमीपर्यंत सोबत असलेल्या लक्ष्मणन आणि सचिन यांच्यात अखेरच्या काही अंतरात कडवा संघर्ष पाहायला मिळाला. लक्ष्मणनने १ तास ०५ मिनिटे ०५ सेकंदात अव्वल स्थान पटकावले. सचिन १ तास ०६ मिनिटे २२ सेकंदांसह दुसरा, तर दीपक १ तास ०६ मिनिटे २८ सेकंदांसह तिसरा आला.

ज्योती गवतेचा आत्मविश्वास सार्थ

ललिता बाबर, सुधा सिंग, कविता राऊत व ओ. पी. जैशा या अनुभवी धावपटूंच्या अनुपस्थितीत पूर्ण मॅरेथॉनच्या भारतीय महिला गटात आपणच बाजी मारू, असा आत्मविश्वास शर्यतीच्या पूर्वसंध्येला दाखवणाऱ्या महाराष्ट्राच्या ज्योती गवतेने तो सार्थ ठरवला. ज्योतीने महिला गटात निर्विवाद वर्चस्व गाजवताना २ तास ५० मिनिटे ५३ सेकंदांची वैयक्तिक सर्वोत्तम वेळ नोंदवून अव्वल क्रमांक पटकावला. गतवर्षी सहाव्या (२:५४:२० से.) क्रमांकावर समाधान मानावे लागलेल्या ज्योतीने कामगिरीत सुधारणा केली, परंतु या कामगिरीवर समाधानी नसल्याचे तिने स्पष्ट केले. ती म्हणाली, ‘‘यापेक्षा चांगली कामगिरी करता आली असती. २ तास ५० मिनिटांचे लक्ष्य डोळ्यासमोर ठेवले होते. मात्र, अपयशी ठरले.’’  पश्चिम बंगालच्या श्यामली सिंगने ०३ तास ०८ मिनिटे व ४१ सेकंदासह दुसरे, तर लडाखच्या जिग्मेट डोल्माने (३:१४:३८ से.) येथे पहिल्यांदा सहभाग नोंदवताना तिसरे स्थान पटकावले.

खेता विजयी, परंतु धोनीचे दडपण

बहादूर सिंग धोनीचा कडवा संघर्ष मोडून काढत अवघ्या ६ सेकंदांच्या फरकाने ऑलिम्पिकपटू खेता रामने पूर्ण मॅरेथॉनमध्ये पुरुष गटात अजिंक्यपद पटकावले. नितेंद्र सिंग रावत आणि गोपी टी. यांच्या अनुपस्थितीत जेतेपदासाठी खेतासह मोहम्मद युनूस व एलाम सिंग यांच्या नावाची चर्चा होती. यामध्ये धोनी कुणाच्या ध्यानीमनीही नव्हता. मात्र धोनीने सुरुवातीपासूनच खेतावर दडपण कायम ठेवले. खेताने अनुभवाच्या जोरावर २ तास १९ मिनिटे ५१ सेकंदात ही शर्यत पूर्ण करत बाजी मारली, परंतु धोनीने २ तास १९ मिनिटे ५७ सेकंदासह कारकीर्दीतील आत्तापर्यंतची सर्वोत्तम वेळ नोंदवली. मणिपूरच्या टी. एच. संजिथ लुवांगने (२:२१:१९ से.) तिसरा क्रमांक पटकावला.

आकडा वाढला, परंतु उत्साह मावळला

मुंबई मॅरेथॉनमध्ये सहभाग नोंदवणाऱ्या धावपटूंच्या आकडय़ात वाढ झाली असली तरी मुंबईकरांचा उत्साह मावळलेला पाहायला मिळाला. खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी एरवी छत्रपती शिवाजी टर्मिनल्सकडे वळणारे प्रेक्षक रविवारी दिसले नाहीत. आयोजकांनीही ठिकठिकाणी उभ्या केलेल्या पत्र्यांच्या भिंतींमुळे प्रेक्षकांना तारेवरची कसरत करावी लागत होती. मलबार हिल आणि वरळी डेअरी वगळता प्रेक्षकांचा फारसा उत्साह कुठेच जाणवत नव्हता.