‘‘२०१७ मध्ये भारतात होणाऱ्या १७ वर्षांखालील फुटबॉल विश्वचषक स्पध्रेचे सामने हे नैसर्गिक मैदानावर खेळवण्याला आमचे प्राधान्य असेल. मात्र फिफाने मान्यता दिलेल्या टर्फ मैदानावरही काही सामने खेळवले जाऊ शकतात,’’ असे फिफाचे स्पर्धा आयोजक प्रमुख कॉलिन स्मिथ यांनी वक्तव्य केल्यामुळे मुंबईकरांचा हिरमोड होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत कुपरेज हे फुटबॉलसाठी एकच मैदान उपलब्ध आहे आणि त्यावरही टर्फ बसवण्यात आलेले आहे. फिफाचे निकष कुपरेज मैदान पूर्ण करण्यात यशस्वी झाले तरी इतर बाबतीत ते कमी पडत असल्याने मुंबईकरांना या विश्वचषकाचा आनंद टीव्हीवरच पाहून लुटावा लागेल, अशी चिन्हे सध्या तरी दिसत आहेत.  असे झाल्यास हा मान  डी. वाय. पाटील स्टेडियमला मिळू शकतो.
या स्पध्रेच्या निमित्ताने स्थानिक संघटनांशी चर्चा करण्यासाठी स्मिथ आणि व्यवस्थापक जैम यार्झा भारतात आले आहेत. या वेळी स्मिथ यांनी स्पर्धा आयोजनासाठी नैसर्गिक मैदानाला पसंती असल्याचे सांगितले. परंतु अ‍ॅस्ट्रो टर्फवर सामने न खेळविण्याच्या वृत्तावर त्यांनी शिक्कामोर्तब केले नाही. ‘‘नैसर्गिक गवत असलेल्या मैदानांना प्राधान्य दिले जाईल. मात्र टर्फचा वापर झालेला असेल, त्याची गुणवत्ता सर्वोत्तम असेल आणि फिफाकडून त्याला मान्यता मिळालेली असेल, अशा मैदानांवर सामने होऊ शकतात,’’ असे त्यांनी सांगितले.
‘‘फिफाच्या निकषांची नवी मुंबईतील डी. वाय. पाटील स्टेडियम पूर्तता करीत आहे. या स्टेडियमवर इंडियन सुपर लीगचे सामने खेळविण्यात आले आहेत. कुपरेज मैदान या शर्यतीतून बाद झाल्यास डी. वाय. पाटील स्टेडियमचा पर्याय आमच्यासमोर आहे,’’ अशी माहिती अखिल भारतीय फुटबॉल महासंघाचे सहसचिव कुशल दास यांनी दिली.  

मुंबईसमोरील अडचणी
*वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशनचे (विफा) कुपरेज मैदानावर अ‍ॅस्ट्रो टर्फ बसविण्यात आलेले आहे. मात्र, फिफाला विश्वचषकासाठी नैसर्गिक गवत असलेले मैदान हवे
*सामने खेळविण्यात येणाऱ्या मैदानाशेजारी सरावासाठी दोन मैदानांची अट विफाला पूर्ण करण्यात अपयश येणार आहे. विफाकडून बॉम्बे जिमखाना व विद्यापीठ मैदानाचा प्रस्ताव
*कुपरेजची प्रेक्षकक्षमता केवळ ५००० इतकी आहे, विश्वचषकाचे सामन्यांसाठी ती ५० हजारांपर्यंत असणे अपेक्षित.

कुपरेज मैदानावर अ‍ॅस्ट्रोटर्फ आहे. फिफाच्या नियमांचा अभ्यास केल्यास टर्फ मैदान असल्यास तशीच चार मैदाने सरावासाठी असणे आवश्यक आहेत. मुंबईत ते शक्य नाही. सराव मैदानांसाठी आम्ही बॉम्बे जिमखाना व विद्यापीठाच्या मैदानांचा पर्याय ठेवला होता, परंतु तोही अमान्य झाला. प्रेक्षकक्षमता आणि खेळाडूंच्या अन्य व्यवस्थेतही कुपरेज बसत नाही. या निकषांची डी. वाय. पाटील स्टेडियम पूर्तता करते.
– साऊटर वाझ, ‘विफा’चे सचिव

नवी मुंबईतील डी. वाय. पाटील स्टेडियमकडून निकषांची पूर्तता
विश्वचषकाची तयारी ९ ते १२ महिने आधी पूर्ण व्हावी!
२०१७ मध्ये होणाऱ्या १७ वर्षांखालील फुटबॉल विश्वचषक स्पध्रेच्या आयोजनासाठी भारताने चांगलीच कंबर कसली आहे. स्पध्रेच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी भारतात आलेल्या फिफा प्रतिनिधींनी स्पध्रेच्या नऊ महिने आधी स्टेडियमचे काम पूर्ण होणे आवश्यक असल्याचे नमूद केले आहे. ‘‘स्पध्रेचे सामने ज्या स्टेडियमवर आयोजित करण्यात येणार आहेत, ते स्टेडियम स्पर्धा कालावधीच्या ९ ते १२ महिन्या आधी तयार होणे आवश्यक आहे. त्यामुळे त्या स्टेडियमची चाचणी घेता येईल आणि सरावही करता येईल,’’ असे मत फिफाचे स्पर्धा आयोजक प्रमुख कॉलिन स्मिथ यांनी व्यक्त केले.