मुंबई २ बाद १०३

शार्दूल ठाकूर, बलविंदर संधूचे चार बळी; श्रेयस अय्यरचे नाबाद अर्धशतक

रेल्वेविरुद्धच्या पहिल्याच रणजी सामन्यात तीन शतके आणि एक द्विशतकांसह सहाशे धावांचा डोंगर उभारून डावाने विजय मिळवण्याची किमया साधणाऱ्या पंजाबला मुंबईने पहिल्याच दिवशी अस्मान दाखवले. शार्दूल ठाकूर आणि बलविंदर संधू यांच्या वेगवान माऱ्यापुढे पंजाबचा डाव फक्त १५४ धावांत गडगडला. मग अखेरच्या सत्रात श्रेयस अय्यरने जिद्दीने आणि वेगाने खेळत नाबाद अर्धशतक साकारले. त्यामुळे पहिल्या दिवसअखेर मुंबईचा संघ २ बाद १०३ अशा सुस्थितीत होता. वानखेडे स्टेडियमवरील ‘ब’ गटातील रणजी सामन्याच्या पहिल्या दिवशी गोलंदाजांचे वर्चस्व पाहता ही लढत निर्णायक होण्याचे संकेत दिले आहेत.

आंध्र प्रदेशविरुद्ध सलामीच्या लढतीत जेमतेम एक गुण मिळवू शकणाऱ्या मुंबईने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. जीवनज्योत सिंग आणि मनदीप व्होरा यांनी ३९ धावांची सलामी नोंदवल्यानंतर संधूने स्वत:च्या गोलंदाजीवर झेल टिपून पंजाबला पहिला धक्का दिला. यानंतर पंजाबच्या फलंदाजांनी हाराकिरी पत्करली आणि कर्णधार आदित्य तरेचा निर्णय सार्थ ठरला. उपाहाराला ३ बाद ६९, चहापानाला ७ बाद १४३ अशा कठीण स्थितीतून पंजाबला सावण्याचे धर्य कोणत्याही फलंदाजाला दाखवता आले नाही. चहापानानंतर चौथ्या षटकात १५४ धावसंख्येवर पंजाबच्या पहिल्या डावाला पूर्णविराम मिळाला. सलामीवीर व्होराने सर्वाधिक ३४ धावा केल्या, तर गीतांश खेराने शून्यावर मिळालेल्या जीवदानाचा फायदा उचलत ३२ धावा केल्या. अनुभवी युवराज सिंगचा (१३) अडसर संधूने दूर केला. मुंबईकडून शार्दूलने ४७ धावांत ४ बळी घेतले, तर संधूने ३१ धावांत ४ बळी घेण्याची किमया साधली.

त्यानंतर, अखिल हेरवाडकर (१९) आणि श्रीदीप मंगेला (७) लवकर तंबूत परतल्यामुळे मुंबईचीसुद्धा २ बाद ४१ अशी त्रेधातिरपीट उडाली. मात्र श्रेयस अय्यरने सूर्यकुमारला साथीला घेत पंजाबच्या गोलंदाजांवर हल्लाबोल चढवला आणि मुंबईचा डाव सावरला. श्रेयसने तासभर किल्ला लढवताना फक्त ४३ चेंडूंत १० चौकार आणि एका षटकाराची आतषबाजी करीत नाबाद ६१ धावा केल्या. पंजाबच्या सिद्धार्थ कौल आणि ब्रेंडर शर्ण यांनी प्रत्येकी एकेक बळी मिळवला.

दरम्यान, मुंबईचे क्षेत्ररक्षण सुरू असताना कर्णधार तरेचे स्नायू दुखावल्यामुळे तो मैदानावरच कोसळला. मात्र काही कालावधीतच सावरून त्याने यष्टीरक्षण केले. त्याची प्रकृती सुस्थितीत असून, तो शुक्रवारी खेळणार आहे, असे मुंबईच्या संघव्यवस्थापनाकडून सांगण्यात आले.

संक्षिप्त धावफलक

पंजाब (पहिला डाव) : ५७ षटकांत सर्व बाद १५४ (मनन व्होरा ३४, गीतांश खेरा ३२; शार्दूल ठाकूर ४/४७, बलविंदर संधू ४/३१)

मुंबई (पहिला डाव) : १८ षटकांत २ बाद १०३ (श्रेयस अय्यर खेळत आहे ६१, सूर्यकुमार यादव खेळत आहे १९; ब्रेंडर सर्ण १/२८).