सूर्यकुमार यादवचे शतक; शेष भारत १ बाद ३६
अखिल हेरवाडकर आणि जय बिस्ताने रचलेल्या मजबूत पायावर सूर्यकुमार यादवने दुसऱ्या दिवशी धावांचे इमले रचले. यादवने झळकावलेल्या दीडशतकाच्या जोरावर मुंबईने इराणी चषक क्रिकेट स्पध्रेत शेष भारताविरुद्ध ६०३ धावांचा डोंगर उभा केला. प्रत्युत्तरात शेष भारताने दिवसअखेर एक फलंदाज गमावून ३६ धावा केल्या आहेत.
३ बाद ३८६ धावांवरून दुसऱ्या दिवसाची सुरुवात करणाऱ्या मुंबईने दुसऱ्या दिवशीही वर्चस्व गाजवले. यादवने चौथ्या गडीसाठी कर्णधार आदित्य तरेसह केलेल्या १६२ धावांच्या भागीदारीच्या जोरावर मुंबईने शेष भारतावर मजबूत पकड बनवली. यादव व तरे जोडीने जवळपास ५० षटके खेळून ३.२६च्या सरासरीने धावफलक हलता ठेवला. १५१ चेंडूंत ९ चौकारांसह ६५ धावांची खेळी करणाऱ्या तरेला कृष्णा दासने माघारी धाडले.

त्यानंतर आलेल्या सिद्धेश लाडने यादवला साजेशी साथ दिली. दोघांनी अर्धशतकी भागीदारी करून संघाला पाचशेचा पल्ला पार करून दिला. मात्र, खेळपट्टीवर नांगर रोवून बसलेल्या यादवला जयंत यादवने बाद केले. त्याने २७१ चेंडूंत २४ चौकार व १ षटकार खेचून १५६ धावा केल्या. त्यानंतर लाडने चिवट खेळ करत संघाला सहाशेचा पल्ला पार करून दिला. लाडने आठव्या विकेटसाठी इक्बाल अब्दुल्लासह ४६ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली. लाड ६६ धावांवर जयदेव उनाडकटच्या गोलंदाजीवर माघारी परतला. त्यानंतर शेष भारताने तळाच्या फलंदाजांना गुंडाळून मुंबईचा डाव ६०३ धावांवर संपुष्टात आणला. शेष भारताकडून जयंत यादवने सर्वाधिक ४ बळी टिपले.
६०३ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना शेष भारताला अवघ्या २९ धावांवर पहिला धक्का बसला. अभिषेक नायरने सलामीवीर श्रीकर भारतला वैयक्तिक १६ धावांवर असताना बाद केले. दिवसअखेर फजल व जयंत यादवने किल्ला लढवत शेष भारताला १ बाद ३६ धावा करून दिल्या आहेत.

संक्षिप्त धावफलक
मुंबई : ६०३ (अखिल हेरवाडकर ९०, जय बिस्ता १०४, सूर्यकुमार यादव १५६, आदित्य तरे ६५, सिद्धेश लाड ६६; जयंत यादव ४-१३२) विरुद्ध शेष भारत : १ बाद ३६ (फैज फजल खेळत आहे १८, जयंत यादव खेळत आहे १).