मुंबई आता आपल्या महत्त्वाकांक्षी चाळिसाव्या रणजी जेतेपदापासून फक्त दोन पावलांच्या अंतरावर आहे. पालम एअरफोर्स मैदानावर बुधवारपासून सुरू होणाऱ्या उपांत्य सामन्यात मुंबईची गाठ पडत आहे ती आश्चर्यकारक कामगिरीचे प्रदर्शन करणाऱ्या सेनादलाशी. या सामन्यात स्वाभाविकपणे सर्वाच्या नजरा असतील त्या मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरवर.
अजित आगरकरच्या नेतृत्वाखालील मुंबईच्या संघाला स्पध्रेआधी संभाव्य विजेते म्हणूनच गणले जात होते. परंतु प्रारंभीच्या काही सामन्यांमध्ये अपेक्षित कामगिरी उंचावू न शकल्यामुळे मुंबईचा प्रवास खडतर झाला. पण शेवटच्या सामन्यांमध्ये चुणूक दाखवत मुंबईने बाद फेरीत प्रवेश केला.
कागदावर पाहिल्यास मुंबईपुढे सेनादलाची अजिबात तुलना होऊ शकत नाही. आंतरराष्ट्रीय कीर्तीचा फलंदाज सचिन, स्थानिक क्रिकेटमधील धावांची फॅक्टरी वसिम जाफर, अष्टपैलू अभिषेक नायर याचप्रमाणे फॉर्मात असलेले युवा फलंदाज हिकेन शाह आणि कौस्तुभ पवार यांच्यावर मुंबईची मदार आहे.
‘‘रणजी स्पध्रेच्या या स्तरापर्यंत आम्ही अनेकदा खेळलो आहोत. त्यामुळे आम्हाला या सामन्याचे फार दडपण नाही,’’ असे आगरकरने सांगितले. तो पुढे म्हणाला, ‘‘तुमच्याकडे जेव्हा सचिनच्या दर्जाचा खेळाडू असतो, तेव्हा त्याचा सामन्यात फार फरक पडतो. वासिम गेली अनेक वष्रे मुंबईच्या फलंदाजीची धुरा सांभाळतो आहे. तसेच अभिषेक नायरकडून या हंगामात फार चांगली कामगिरी होत आहे. हिकेन आणि कौस्तुभ हे नव्या दमाचे खेळाडूही जबाबदारीने खेळत आहेत.’’
डावखुरा फिरकी गोलंदाज विशाल दाभोळकरच्या गोलंदाजीवर सचिनने सराव सत्रात छान फटकेबाजी केली. सराव संपल्यावर सेनादल क्रीडा नियंत्रण मंडळाचे सचिव बालादित्य यांना साइटस्क्रिनची उंची वाढविण्याची विनंती केली.
सेनादलाच्या संघाने तब्बल पाच दशकांनंतर रणजीच्या उपांत्य फेरीत स्थान मिळवले आहे. नियमित संघनायक शौमिक चटर्जीशिवाय सेनादलाचा संघ बुधवारी उतरण्याची शक्यता आहे. उत्तर प्रदेशविरुद्धच्या उपांत्यपूर्व सामन्यात पायाला दुखापत झाली असतानाही झुंजार वृत्तीने लढून त्याने संघाला विजय मिळवून दिला होता.
सौराष्ट्रची गाठ पंजाबशी
राजकोट : पंजाबने साखळी सामन्यात सौराष्ट्रला हरविण्याची किमया साधली होती. परंतु खंडेरीच्या सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर बुधवारपासून सुरू होणाऱ्या उपांत्य सामन्यात मात्र पंजाबसाठी परिस्थिती तितकी सोपी नसेल. ‘‘आम्ही चांगली कामगिरी दाखवली, त्यामुळे आम्ही रणजी करंडक स्पध्रेच्या उपांत्य फेरीपर्यंत पोहाचू शकलो आहोत. सौराष्ट्रला हरवून आम्ही अंतिम फेरी गाठू,’’ असा विश्वास पंजाबचा कर्णधार हरभजनसिंगने प्रकट केला.