इतिहास, खेळाडूंची कामगिरी आणि वानखेडे स्टेडियम या साऱ्या गोष्टी जरी अनुकूल असल्या तरी मुंबईचा संघ निर्धास्त नक्कीच नाही. कारण प्रथमच अंतिम फेरीत पोहोचणाऱ्या सौराष्ट्रच्या संघाने या प्रवासात अनेक दिग्गज संघांना धक्के दिले आहेत. त्यामुळेच शनिवारपासून सुरू होणाऱ्या रणजी करंडक क्रिकेट स्पध्रेच्या अंतिम सामन्यात मुंबईचा संघ कमालीचा सावध असला तरी चाळिसाव्या विजेतेपदाचा निर्धार मात्र पक्का आहे.
मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकर, कर्णधार अजित आगरकर, स्थानिक क्रिकेटमधील धावांची टाकसाळ म्हणून ओळखला जाणारा वासिम जाफर यांच्यासोबत यंदाच्या हंगामात धावांचा पाऊस पाडणारा अभिषेक नायर, यष्टीरक्षक आदित्य तरे या रथी-महारथी खेळाडूंसह मुंबईचा संघ कागदावर तरी वरचढ भासतो आहे. पश्चिम विभागातील आणि यंदाच्या रणजीच्या नव्या सूत्रानुसार अ गटामधील सौराष्ट्रचा संघ ‘अंडरडॉग्ज’ ठरला. परंतु वानखेडे स्टेडियमवर मुंबईकर क्रिकेटरसिकांच्या साक्षीने अंतिम सामन्यात मात्र त्यांची कसोटी लागणार आहे. प्रारंभी वेगवान गोलंदाजांना अनुकूल ठरणारी ही खेळपट्टी शेवटच्या दोन दिवसांत फिरकीलाही मदत करते.
मुंबईच्या संघाने याआधी ४३वेळा अंतिम फेरी गाठली, यापैकी फक्त चार वेळा त्यांना विजेतेपद पटकावण्यात अपयश आले. राष्ट्रीय अजिंक्यपदाचा वैभवशाली इतिहास मुंबईच्या पाठीशी आहे. ‘‘बाद फेरी गाठण्यासाठी आम्हाला खूप झगडावे लागले. परंतु हा सारा प्रवास करून आम्ही अंतिम फेरीपर्यंत पोहोचलो, त्याचा मला अतिशय आनंद आहे. सौराष्ट्रचा संघ आव्हानात्मक प्रतिस्पर्धी आहे. त्यांना कमी लेखून चालणार नाही,’’ असे मुंबईचा कप्तान अजित आगरकरने सामन्याच्या पूर्वसंध्येला पत्रकार परिषदेत सांगितले. पालम येथे सेनादलाविरुद्धच्या सामन्यात मुंबईचा डाव कोसळला होता, तेव्हा आगरकरने शतकी खेळी साकारून संघाचा डाव सावरला होता.
सौराष्ट्रचा कर्णधार जयदेव शाह म्हणाला की, ‘‘हा आमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा सामना आहे. मुंबईकडे स्थानिक क्रिकेटचा चांगला अनुभव पाठीशी आहे. आम्ही चांगली सुरुवात करून पहिल्या डावात मोठी धावसंख्या उभारण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करू.’’ शाहने पंजाबविरुद्धच्या उपांत्य सामन्यात ८७ धावांची खेळी साकारली होती.
दोन्ही संघांना रणजी करंडक स्पध्रेच्या अंतिम सामन्यात महत्त्वाच्या खेळाडूंची उणीव भासणार आहे. चेतेश्वर पुजारा आणि रवींद्र जडेजा यांच्याशिवाय सौराष्ट्रचा संघ उतरणार आहे, तर मुंबईचा संघ अजिंक्य रहाणे, रोहित शर्मा आणि दुखापतग्रस्त झहीर खान यांच्याशिवाय सज्ज झाला आहे. परंतु सचिन संघात असल्यामुळे मुंबईचा आत्मविश्वास दुणावला आहे.
याविषयी आगरकर म्हणाला की, ‘‘रोहित, अजिंक्य आणि झहीर यांच्यासारख्या दिग्गज खेळाडूंची उणीव आम्हाला नक्कीच भासेल. परंतु सचिन संघात असल्याचा मोठा आत्मविश्वास आमच्या पाठीशी आहे. ड्रेसिंगरूममधील त्याचा वावर युवा खेळाडूंना प्रेरणादायी ठरतो. मी पहिल्यांदा जेव्हा सचिनला भेटलो होतो, तेव्हाप्रमाणेच तो आजही मैदानावर कार्यरत असतो.’’
सचिन यंदाच्या हंगामात तीन सामने मुंबईसाठी ख्ेाळला आणि प्रत्येक सामन्यात त्याने योगदान दिले. साखळीतील सलामीच्या सामन्यात रेल्वेविरुद्ध आणि उपांत्यपूर्व सामन्यात बडोद्याविरुद्ध सचिनने शतके झळकावली. याचप्रमाणे सेनादलाविरुद्धच्या उपांत्य सामन्यात मुंबईचा डाव ३ बाद २३ असा ढासळला असताना सचिनने ५६ धावांची खेळी साकारून अभिषेक नायर(७०)सोबत संघाचा डाव सावरला.
यंदाच्या रणजी हंगामात सर्वाधिक धावांच्या पंक्तीत १०४.४४च्या सरासरीने ९४० धावांसह नायर तिसऱ्या स्थानावर आहे. त्याने तीन शतके आणि आठ अर्धशतके झळकावली आहेत. याचप्रमाणे आदित्य तरे (८३९), रोहित शर्मा (७१२) आणि वासिम जाफर (७०३) यांनी भरघोस धावा काढल्या.
गोलंदाजीमध्ये मुंबईचा डावखुरा फिरकी गोलंदाज अंकित चव्हाणने ९ सामन्यांत ३३ बळी मिळवले आहेत. पंजाबविरुद्ध त्याने २३ धावांत ९ बळी घेण्याची किमया साधली होती. अंकित आणि विशाल दाभोळकर या दोन डावखुऱ्या फिरकी गोलंदाजांवर विश्वास व्यक्त करणाऱ्या मुंबईला ऑफ-स्पिनरची उणीव नक्की भासेल.