* सौराष्ट्र फॉलोऑनच्या छायेत
*  मुंबईचा शिस्तबद्ध मारा
यंदाच्या रणजी हंगामात विजयाची चव अद्याप न चाखलेल्या मुंबईने पहिल्यावहिल्या विजयाच्या दिशेने दमदार आगेकूच केली आहे. ६०६ धावांचा डोंगर उभारल्यानंतर मुंबईच्या गोलंदाजांनी टिच्चून मारा करत सौराष्ट्रच्या डावाला खिंडार पाडले आणि मोठय़ा विजयाची पायाभरणी केली. तिसऱ्या दिवसअखेर सौराष्ट्रच्या ८ बाद २४८ धावा झाल्या आहेत.
२ बाद ४१ वरून पुढे खेळणाऱ्या सौराष्ट्रच्या डावाला आधार दिला तो जयदेव शाह आणि अर्पित वसवदा यांनी. जयदेवने १३ चौकारांसह ६० धावांची खेळी केली, तर अर्पित वसवदाने १५ चौकारांसह नाबाद ८३ धावांची खेळी केली. सौर्या सनादियाने ३७ धावा करत अर्पितला चांगली साथ दिली. मुंबईचा कर्णधार अजित आगरकरने सौराष्ट्रची भिंत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सितांशू कोटकला अंकित चव्हाणकरवी झेलबाद करत सौराष्ट्रला मोठा धक्का दिला. या सामन्यासाठी संघात समाविष्ट करण्यात आलेल्या जावेद खानने शतकाकडे कूच करणाऱ्या जयदेव शाहला बाद करत सौराष्ट्रच्या धावगतीला वेसण घातली. धवल कुलकर्णी आणि इक्बाल अब्दुला यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या. दिवसभरात सौराष्ट्रने अवघ्या २४६ धावांचीच भर घातली. सौराष्ट्रचा संघ अजूनही ३५८ धावांनी पिछाडीवर आहे.