तीन सामन्यांमध्ये मुंबईच्या खात्यावर जमा आहेत फक्त ७ गुण. निर्णायक विजय अद्याप मुंबईला साकारता आलेला नाही. शनिवारपासून ब्रेबॉर्न स्टेडियमवर मुंबईचा चौथा सामना सुरू होतो आहे तो बलाढय़ बंगालशी. हैदराबादविरुद्धच्या सामन्यात मुंबईला पहिल्या डावातील पिछाडीमुळे फक्त एका गुणावर समाधान मानावे लागले होते. त्या सामन्यात प्रभारी कर्णधार रोहित शर्माचे शतक आणि हिकेन शाह, अभिषेक नायर व यष्टिरक्षक आदित्य तरेने अर्धशतके झळकावली होती; तथापि इंदूरमध्ये बंगालने मध्य प्रदेशकडून १३८ धावांनी दारुण पराभव पत्करला होता. मागील चार सामन्यांमधील तो बंगालचा दुसरा पराजय ठरला. त्यामुळे सध्या अ गटात मुंबई (७ गुण) आणि बंगाल (६ गुण) अनुक्रमे तिसऱ्या आणि पाचव्या स्थानावर आहेत.
‘‘आम्ही मुंबईविरुद्धच्या सामन्यात सकारात्मक पद्धतीने सामोरे जात आहोत. मुंबईचा संघ चांगला आहे. आमच्याकडेही दर्जेदार गोलंदाज आहेत. त्यामुळे त्यांच्या आक्रमणाचा आम्ही समर्थपणे सामना करू. या सामन्यातून बरेच गुण कमविण्याचा आमचा इरादा आहे,’’ असे बंगालचा कप्तान मनोज तिवारीने स्पष्ट केले. बोटाला झालेल्या दुखापतीतून सावरल्याने आता मुंबईविरुद्धच्या सामन्यासाठी तिवारी सज्ज झाला आहे; परंतु इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी निवड झाल्यामुळे वेगवान गोलंदाज अशोक दिंडाची अनुपस्थिती बंगालला जाणवणार आहे. याचप्रमाणे महत्त्वाचा फलंदाज अनुश्तूप मुझुमदारही दुखापतीमुळे या सामन्यात खेळू शकणार नाही.
‘‘स्थानिक क्रिकेटमध्ये सर्वोत्तम गोलंदाजी करणाऱ्या दिंडाची उणीव आम्हाला भासेल. मागील सामन्यात हॅट्ट्रिकसह ११ बळी घेणारा गोलंदाज शमी अहमद आमच्याकडे आहे. त्यामुळे आमचा गोलंदाजीचा मारा अप्रतिम आहे,’’ असे तिवारीने सांगितले.
नियमित संघनायक अजित आगरकर अजून दुखापतीतून पूर्णपणे सावरला नसल्यामुळे रोहित शर्माकडेच या सामन्याचे नेतृत्व सोपविण्यात आले आहे; परंतु सूर्यकुमार यादव दुखापतीतून सावरल्यामुळे मुंबईला दिलासा मिळाला आहे. याचप्रमाणे स्थानिक क्रिकेटमध्ये जोमाने धावा काढणारा माजी कप्तान वसिम जाफरसुद्धा हाजयात्रेहून परतल्यानंतर संघात सामील झाला आहे.
‘‘जाफर संघात परतल्यामुळे आमची फलंदाजी अधिक मजबूत झाली आहे. त्याच्या प्रदीर्घ अनुभवाचा आणि कौशल्याचा आम्हाला नक्कीच फायदा होईल. बंगालविरुद्धच्या सामन्यात जाफर सलामीला उतरेल आणि धावा काढेल,’’ अशी आशा रोहित शर्माने प्रकट केली.
बंगालविरुद्धच्या सामन्यासाठी मुंबईचा संघ असा : रोहित शर्मा (कर्णधार), वसिम जाफर, रमेश पोवार, सूर्यकुमार यादव, अविष्कार साळवी, कौस्तुभ पवार, अभिषेक नायर, प्रफुल्ल वाघेला, हिकेन शाह, इक्बाल अब्दुल्ला, क्षेमल वायंगणकर, धवल कुलकर्णी, अंकित चव्हाण, आदित्य तरे आणि शार्दुल ठाकूर.