मुंबई उपनगर संघाने महाराष्ट्र राज्य कुमार व कुमारी अजिंक्यपद व निवड चाचणी स्पध्रेच्या कुमारी गटाच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. जेतेपदासाठी त्यांच्यासमोर सांगलीचे आव्हान आहे. कुमार गटात पालघर विरुद्ध रत्नागिरी अशी अंतिम लढत रंगणार आहे. महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने व सिंधुदुर्ग कबड्डी असोसिएशनच्या यजमानपदाखाली सावंतवाडी येथील जिमखाना मैदानावर दिवंगत विलास रांगणेकर क्रीडा नगरीमध्ये ही स्पर्धा सुरू आहे.
कुमारी गटात मुंबई उपनगरने २२-१७ अशा फरकाने मुंबई शहरचा पराभव करीत अंतिम फेरीत प्रवेश मिळविला. मध्यंतराला उपनगरडे १०-८ अशी आघाडी होती. उपनगरच्या आक्रमक चढाईपटू निकिता उत्तेकर व सायली जाधव यांनी चौफेर हल्ला चढवित व पल्लवी बोटेने सुरेख पकडी घेत शहरला नमविण्यात मोलाचा वाटा उचलला. शहरच्या राजश्री चौघुले व मेघा कदम यांनी चांगला प्रतिकार केला़ मात्र, त्यांना पराभव टाळता आला नाही. अत्यंत चुशीच्या सामन्यात सांगलीने ६-० अशा फरकाने रत्नागिरीवर विजय मिळविला. सुरुवातीपासूनच दोन्ही संघ एकमेकांची ताकद अजमाविण्याच्या प्रयत्न करीत होते. पहिल्या सत्रात दोन्ही संघांना शून्य गुणावर समाधान मानावे लागले. मध्यंतरानंतर नेहा सांगलीकरने रत्नागिरीच्या तस्लीम बुरोडकरची पकड घेत आपल्या संघाला पहिला गुण मिळवून दिला. यानंतर सांगलीने पुन्हा अत्यंत संयमी खेळ करत आघाडी कायम राखली. सामना संपायला तीन मिनिटे बाकी असताना पल्लवी जाधवने गुण घेत सांगलीच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.
कुमार गटात पालघर आणि कोल्हापूर यांच्यात झालेल्या सामन्यात नवख्या पालघरने अंतिम फेरीत प्रवेश केला. पालघरने हा सामना १९-४ असा जिंकला. पालघरच्या राहुल घरत व नरेश धंडले यांनी चांगल्या पकडी केल्या. कोल्हापूरच्या रोहित पाटीलने एकाकी झुंज दिली. अत्यंत अटीतटीच्या लढतीत रत्नागिरीने परभणीवर १३-८ असा विजय मिळवला. निर्धारित वेळेत ४-४ असा बरोबरीनंतर सामना पाच-पाच चढायांमध्ये खेळविण्यात आला. त्यात रत्नागिरीने अनुभवाच्या जोरावर बाजी मारली. रत्नागिरीच्या शुभम िशदेने आपल्या चौथ्या क्रमांकाच्या चढाईत तीन गुण मिळवीत संघाच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला.