आंध्र प्रदेशबरोबर सलामीची लढत आजपासून

रणजी जेतेपदाची चाळिशी अनुभवलेल्या मुंबईच्या संघाची कामगिरी गेल्या काही वर्षांमध्ये खालावलेली दिसली, पण हा जेतेपदांचा दुष्काळ संपवण्यासाठी आदित्य तरेच्या नेतृत्वाखालील मुंबईचा युवा संघ सज्ज झालेला आहे. चंद्रकांत पंडित यांच्याकडे संघाचे प्रशिक्षकपद देण्यात आले असून त्यांचा अनुभव आणि युवा खेळाडूंचा जोश संघाला जेतेपद मिळवून देईल का, याची उत्सुकता साऱ्यांना असेल.
बुचीबाबू स्पर्धेत मुंबईने जेतेपद पटकावले असून सराव सामन्यांमध्येही त्यांनी दमदार कामगिरी केली आहे. गेल्या वर्षी जम्मू-काश्मीरसारख्या संघाकडून मुंबईला पराभवाचा सामना करावा लागला असला तरी त्यांनी उपांत्य फेरीत धडक मारली होती. या वेळी संघाला अनुभवी वसीम जाफरची उणीव जाणवणार असली तरी संघातील युवा खेळाडूंना ही चांगली संधी असेल. वसीम, सर्फराझ खान यांनी मुंबईला अलविदा केला असून हिकेन शाहचे बीसीसीआयने निलंबन केले आहे. त्याचबरोबर अजिंक्य रहाणे आणि रोहित शर्मा भारतीय संघाच्या सेवेत रुजू असतील. संघात अभिषेक नायर, कर्णधार तरे, सूर्यकुमार यादव आणि धवल कुलकर्णी यांच्याकडे चांगला अनुभव आहेत. त्याचबरोबर श्रेयस अय्यर, सिद्धेश लाड, अखिल हेरवाडकर यांच्याकडून फलंदाजीमध्ये आणि शार्दूल ठाकूर, विशाल दाभोळकर यांच्याकडून गोलंदाजीमध्ये मोठय़ा अपेक्षा असतील.

प्रतिस्पर्धी संघ
मुंबई : आदित्य तरे (कर्णधार व यष्टीरक्षक), बद्रे आलम, विशाल दाभोळकर, हरमीत सिंग, अखिल हेरवाडकर, श्रेयस अय्यर, धवल कुलकर्णी, सिद्धेश लाड, श्रीदीप मंगेला, अभिषेक नायर, निखिल पाटील (कनिष्ठ), अभिषेक राऊत, बलविंदर संधू (कनिष्ठ), शार्दूल ठाकूर आणि सूर्यकुमार यादव.
आंध्र प्रदेश : मोहम्मद कैफ (कर्णधार), प्रशांत कुमार (उपकर्णधार), मुरुमुल्ला स्रीराम, अश्विन हेब्बार, बांदरू अयप्पा, श्रीकार भारत (यष्टीरक्षक), रिकी भुई, काकनी हरीश, ए जी प्रदीप, ज्योती साई कृष्ण, के. व्ही. ससिकांथ, हनुमाप्पा शिवराज, दुवारापू सिवा कुमार, चिपुरापल्ली स्टीफन, बोडावारापू सुधाकर, बोडापाती सुमंथ, पैडीकालवा विजयकुमार.