रणजी करंडक स्पर्धेचे तब्बल ४० वेळा जेतेपद पटकावलेला मुंबईचा संघ सध्या प्रतीक्षेत आहे तो नवीन प्रशिक्षकाच्या. यंदा मुंबईला महाराष्ट्राकडून उपांत्यपूर्व फेरीत पराभूत व्हावे लागले होते आणि त्यानंतर सुलक्षण कुलकर्णी यांची प्रशिक्षकपदावरून उचलबांगडी केली होती. सध्याच्या घडीला भारताचे माजी क्रिकेटपटू लालचंद रजपूत तात्पुरत्या स्वरूपावर प्रशिक्षकपद भूषवत असले तरी आगामी वर्षांसाठी येत्या सोमवारी मुंबईच्या प्रशिक्षकपदाची निवड होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. बुधवारी मुंबई क्रिकेट असोसिएशनने (एमसीए) कार्यकारिणी सदस्यांच्या बैठकीमध्ये प्रशिक्षकपदासाठी इच्छुक असलेल्या सहा जणांच्या मुलाखती घेतल्या होत्या.
मुंबईचा माजी कर्णधार अजित आगरकर प्रशिक्षपदाच्या शर्यतीत अग्रस्थानी असल्याचे बोलले जात आहे. भारताच्या १९८३ च्या विश्वचषक विजेत्या संघातील खेळाडू बलविंदर सिंग संधू, आगरकरबरोबर भारताचे माजी क्रिकेटपटू आणि मुंबईचे माजी प्रशिक्षक प्रवीण अमरे, मुंबईचे माजी क्रिकेटपटू साईराज बहुतुले, पारस म्हांब्रे आणि संदीप दहाड यांचा समावेश आहे.
‘‘एमसीएने प्रशिक्षकपदासाठी उत्सुक असलेल्या सहा उमेदवारांची मुलाखत घेतली आहे. पण कार्यकारी समितीला अजित आगरकरवर अधिक विश्वास असल्याचे बोलले जात असून तोच या शर्यतीमध्ये बाजी मारण्याची दाट शक्यता आहे,’’ असे एमसीएमधील सूत्रांनी सांगितले.
या वेळी रजपूत यांनी वांद्रे-बीकेसी येथील इनडोअर अकादमी एमसीए कशा प्रकारे चालवू शकते याचे सादरीकरण केले. या अकादमीचा खेळाडूंना चांगलाच फायदा होणार असून पायाभूत सुविधांचा कसा वापर करावा, हे रजपूत यांनी आपल्या सादरीकरणामध्ये सांगितले.