घरच्या मैदानावर सूर गवसलेल्या मुंबई सिटी एफसी संघाचा शुक्रवारी नॉर्थ ईस्ट युनायटेड एफसीशी मुकाबला होणार आहे. आंद्रे मॉरित्झच्या शानदार कामगिरीच्या जोरावर मुंबई सिटी एफसीने एफसी पुण्याचा ५-० असा धुव्वा उडवला होता. नॉर्थ इस्टविरुद्धही मॉरित्झवर मोठी जबाबदारी असणार आहे.
फ्रेडी ल्युजेनबर्ग आणि सय्यद नबी दुखापतीतून सावरल्याने मुंबईचा संघ बळकट झाला आहे. दुसरीकडे अ‍ॅटलेटिको डी कोलकाताविरुद्धच्या पराभवाचा वचपा काढण्याची नॉर्थ इस्ट संघाला संधी आहे. नॉर्थ इस्ट संघाला तीन सामन्यात मिळून केवळ दोन गोल केले आहेत. संघाला आक्रमक फुटबॉल खेळण्याची गरज असल्याचे नॉर्थ इस्ट संघाचे प्रशिक्षक रिकी हरबर्ट यांनी सांगितले. घरच्या मैदानावर तीन सामने खेळल्यानंतर प्रथमच नॉर्थ इस्टला प्रतिस्पध्र्याच्या मैदानावर आपले कौशल्य सिद्ध करावे लागणार आहे. स्पेनचा आघाडीपटू कोकेवर नॉर्थ इस्टच्या संघाची भिस्त असणार आहे. बचावाची जबाबदारी मिग्येुल गार्सिआकडे असेल.
लोबोचा दुहेरी धमाका; कोलकाता विजयी
मडगाव : ईस्ट बंगालचा मध्यरक्षक गॅव्हिन लोबोच्या दुहेरी धमाक्याच्या बळावर गुणतालिकेत अव्वल स्थानावर असलेल्या अ‍ॅटलेटिको डी कोलकाता संघाने इंडियन सुपर लीग स्पध्रेत गुरुवारी एफसी गोवा संघावर २-१ असा विजय मिळवला. ब्राझीलच्या आंद्रे सांतोसने २१व्या मिनिटाला गोवा संघाचे खाते उघडले. लोबोने ७२व्या मिनिटाला आपला आयसीएलमधील पहिला गोल झळकावून बरोबरी साधली. त्यानंतर ८२व्या मिनिटाला लोबोने डाव्या पायाचा वापर करीत आणखी एक गोल झळकावला. कोलकाताच्या खात्यावर चार सामन्यांतून १० गुण जमा आहेत.