गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील थंडी गायब झाली होती, पण मुंबई मॅरेथॉन शर्यत जवळ आली आणि पुन्हा एकदा थंडीनेही डोके वर काढले. आता हुडहुडी भरणारी थंडी आणि समुद्रकिनाऱ्यावर वेगाने वाहणारे वारे अंगावर झेलत मुंबई मॅरेथॉनमधील सर्व स्पर्धकांना या सुखावणाऱ्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. धावत्या मुंबईचे दर्शन घडवणारी मुंबई मॅरेथॉन शर्यत रविवारी रंगणार आहे.
गतविजेता लेबान मोईबेन (केनिया), गेल्या वर्षीचा उपविजेता राजी असेफा (इथिओपिया) आणि तिसऱ्या क्रमांकावरील जॉन क्युई यांच्यात या वर्षीही जेतेपद पटकावण्यासाठी ‘काँटे की टक्कर’ असेल. गुलाबी थंडीमुळे इथिओपियाच्या गिरमा असेफा याने २०११ मध्ये नोंदवलेला २ तास ०९ मिनिटे ५४ सेकंदांचा स्पर्धाविक्रम या वर्षी मोडीत निघेल, असे बोलले जाते. हा विक्रम नोंदवणाऱ्या अ‍ॅथलीट्सला १५ हजार अमेरिकन डॉलरचे बोनस इनामही दिले जाणार आहे. गेल्या वर्षी मोईबेन आणि राजी असेफा यांच्यात जेतेपदासाठी कडवी चुरस पाहायला मिळाली होती. पण काही सेकंदांच्या फरकाने मोईबेनने बाजी मारली होती. या वेळी २ तास ०६ मिनिटे २४ सेकंद अशी वेळ नोंदवून जगातील सर्वोत्तम वेगवान धावपटू असल्याचा नावलौकिक मिळवून असेफा मुंबई मॅरेथॉन शर्यतीत उतरणार आहे. त्याचबरोबर २०१२ मध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या मोईबेनने ओटावा मॅरेथॉन जिंकून (२.०९.१३ सेकंद) आपली सर्वोत्तम वेळ नोंदवली आहे.
या दोघांना दक्षिण आफ्रिकेच्या हेन्ड्रिक रामाला याचेही आव्हान असणार आहे. २००४मध्ये मुंबई मॅरेथॉन शर्यत जिंकणाऱ्या रामाला याने ४०व्या वर्षीही सुरेख कामगिरी केली आहे. गेल्या वर्षी दुबई मॅरेथॉनमध्ये २ तास १२ मिनिटांची वेळ नोंदवली होती. त्याचबरोबर इथिओपियाचा अब्राहम गिरमा (२.०६.२८ सेकंद, अ‍ॅमस्टरडॅम मॅरेथॉन, २०१२), केनियाचा फ्रान्सिस किबिवोट (२.०७.३२ टिबेरियस मॅरेथॉन, २०१२), केनियाचा इलिजाह केम्बोई (२.०७.५१, कोसिसे मॅरेथॉन, २०१२), इथिओपियाचा शूमी इटिचा (२.०९.०३, स्टॉकहोम मॅरेथॉन), केनियाचा जोसेफ मरेगू (२.०९.२५), केनियाचा जोसेफ किपटूम (२.०९.५६, हॅनोवर मॅरेथॉन, २०१२) अशी तगडी फौज पुरुषांमध्ये असणार आहे.
महिलांमध्ये लिशान डुला (इथिओपिया), तिची सहकारी अबेरूम मेकुरिया त्याचबरोबर व्हॅलेन्टिन किपकेटर (केनिया), दिन्केश मेकाश, फान्तू जिम्मा आणि डेस्टा टेडासे (इथिओपिया) यांच्यामध्ये जेतेपदासाठी झुंज असेल.
गेल्या वर्षी मुंबई मॅरेथॉनद्वारे लंडन ऑलिम्पिकचे तिकीट निश्चित करणारा सेनादलाचा रामसिंग यादव या वर्षी मुंबई मॅरेथॉनमध्ये सहभागी होणार नसल्यामुळे एलाम सिंग, लिंगखोई बिनिंग, अंगद कुमार, आशीष सिंग, के. सी. रामू आणि सान्तन सिंग यांना जेतेपद पटकावण्याची संधी मिळणार आहे. महिलांमध्ये किरण तिवारी, शास्त्री देवी, भगवती, अनिसा देवी आणि एम. सुधा यांच्यात अव्वल स्थानासाठीची शर्यत असेल. अर्धमॅरेथॉनमध्ये दिग्गज महिला धावपटू सहभागी होणार असल्यामुळे चांगली चुरस पाहायला मिळणार आहे. कविता राऊत, सुधा सिंग या आंतरराष्ट्रीय धावपटूंबरोबरच मोनिका अथरे, प्रियांका सिंग पटेल आणि अनुराधा सिंग यांच्यामध्ये जेतेपदाचा मुकुट पटकावण्याचे आव्हान असेल. भारतीय खेळाडूंमध्ये नवा विक्रम नोंदवणाऱ्या खेळाडूला एक लाखाचे पारितोषिक दिले जाणार आहे.
जसजसा मुंबई मॅरेथॉनचा थाट वाढत जात आहे, त्याचप्रमाणे या स्पर्धेत भाग घेणाऱ्यांच्या संख्यतेही दिवसेंदिवस वाढ होऊ लागली आहे. या वर्षी तब्बल ३८६२० स्पर्धकांनी मुंबई मॅरेथॉनमध्ये आपला सहभाग नोंदवला आहे. पूर्ण मॅरेथॉन शर्यतीत ४०६० धावपटू जेतेपदासाठी झुंजतील. त्यात पुरुषांमध्ये २३३ एलिट अ‍ॅथलीट्समध्ये जेतेपदासाठी खरी चुरस असेल. अर्धमॅरेथॉनमध्ये तब्बल १२ हजार ७०० स्पर्धक सहभागी झाले आहेत.
थेट प्रक्षेपण : स्टार प्लस, डीडी स्पोर्ट्स. वेळ : सकाळी ८ ते ११.
शर्यत    अंतर    सुरुवात    वेळ
अर्ध मॅरेथॉन    २१.०९७ कि.मी.     वांद्रे    सकाळी ५.४०वा.
पूर्ण मॅरेथॉन     ४२.१९५ कि.मी.    छत्रपती शिवाजी    सकाळी ५.४०वा.
(हौशी गट)        टर्मिनस    
पूर्ण मॅरेथॉन     ४२.१८५ कि.मी    छत्रपती शिवाजी    सकाळी ७.२०वा.
(एलिट गट)        टर्मिनस    
अपंगांसाठीची    २.४ कि.मी.    छत्रपती शिवाजी     सकाळी ७.३५ वा.
शर्यत        टर्मिनस
ज्येष्ठ        ४.३ कि.मी.    छत्रपती शिवाजी     सकाळी ८.०० वा.
नागरिकांसाठी शर्यत        टर्मिनस    
ड्रीमरन    ६ कि.मी.    छत्रपती शिवाजी सकाळी ९.०० वा.
            टर्मिनस
कोणत्या सुविधा उपलब्ध
* एक लाख ३५ हजार लिटर पाणी
* १२ वैद्यकीय केंद्रे (२ मुख्य केंद्रे)
* ८ अ‍ॅम्ब्युलन्स, ३५० डॉक्टर तैनात
* १९५० पोलिसांचा फौजफाटा
* १००० खाजगी सुरक्षारक्षक
* १००० स्वयंसेवक, १ हेलिकॉप्टर