भारताचा युवा आंतरराष्ट्रीय मास्टर मुरली कार्तिकेयन याने स्वप्नवत कामगिरीची मालिका सुरू ठेवताना अनुभवी ग्रँडमास्टर अमीन बसीम (इजिप्त) याच्यावर मात केली आणि अबूधाबी चषक बुद्धिबळ स्पर्धेत सनसनाटी विजय नोंदविला. मुरलीने तिसऱ्या फेरीत अ‍ॅलेक्झांडर अर्शेचेन्कोला पराभवाचा धक्का दिला होता. या विजयापासून प्रेरणा घेत त्याने अमीनलाही चकित केले. त्याचे आता पाच फे ऱ्यांमध्ये चार गुण झाले आहेत.
रशियाच्या सर्जी व्होल्कोव्हने ४.५ गुणांसह आघाडी घेतली आहे. त्याने अर्मेनियाच्या तिगरान पेट्रोशियान याच्यावर मात केली. कार्तिकेयन, विदित गुजराथी, जी. एन. गोपाळ या भारतीय खेळाडूंसह आठ खेळाडूंचे प्रत्येकी ४ गुण झाले आहेत.
कार्तिकेयनने किंग्ज इंडियन आक्रमक तंत्राचा सुरेख खेळ केला. त्याने हा डाव केवळ ३७ चालींमध्ये जिंकला. गोपाळने फ्रान्सच्या आंद्रे इस्ट्राटेस्कूचा पराभव करत अनपेक्षित विजय नोंदविला. भारताच्या ग्रँडमास्टर अभिजित गुप्ताने आपलाच सहकारी सहज ग्रोव्हर याच्याशी झटपट बरोबरी स्वीकारली. एस. एल. नारायणन याने युक्रेनच्या ग्रँडमास्टर आंद्रे सुमेट्स याला बरोबरीत रोखत ग्रँडमास्टर किताबाचा निकष मिळविण्याची संधी निर्माण केली.