भरगच्च भरलेल्या बालेवाडीच्या बॉक्सिंग हॉलमध्ये उत्सुकता शिगेला पोहोचली, जेव्हा ‘भारत-श्री’ स्पर्धेचा अंतिम क्षण जवळ आला होता.. ‘चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्स’ नेमका कोण ठरणार, याची खलबते प्रेक्षकांच्या मनात सुरू होती.. ‘काँटे की टक्कर’ असलेल्या स्पर्धेत विजेता कोण ठरणार, याचा अंदाज कोणालाही येत नव्हता.. धडधडत्या हृदयाने श्वास रोखून धरल्यावर जेव्हा नौदलाच्या मुरली कुमारचे नाव विजेता म्हणून घोषित झाले, तेव्हा साऱ्यांनी एकच जल्लोष केला.. सलग दुसऱ्यांदा किताब पटकावणाऱ्या मुरलीच्या डोळ्यांतून आनंदाश्रू तरळले आणि त्याची मेहनत पुन्हा एकदा फळाला आली. महाराष्ट्राच्या २२ वर्षीय स्वप्निल नरवडकरने दुहेरी धमाका करत ‘भारत-श्री’ किताबाबरोबरच प्रगतीकारक शरीरसौष्ठवपटूचा मान पटकावला. तर स्वप्निलबरोबर बी. महेश्वरननेही महाराष्ट्राच्या सुनीत जाधवला मागे टाकत ‘भारत-श्री’ किताब पटकावला.
 अत्यंत चुरशीच्या झालेल्या स्पर्धेत शेवटपर्यंत कोण जिंकेल, हे अनाकलनीय असेच होते. कारण प्रत्येक स्पर्धक पीळदार शरीरयष्टीसह मंचावर येत होता. त्यामुळे विजेतेपदाबाबत भाकीत करणे सोपे नव्हते. मुरली कुमारला कडवी झुंज देणाऱ्या भारतीय रेल्वेच्या राम निवासला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले, तर रेल्वेच्याच जे. चक्रवर्तीने सर्वोत्तम शरीरप्रदर्शकाचा पुरस्कार पटकावला. भारतीय रेल्वेने या वेळी ८६ गुणांसह सांघिक विजेतेपद पटकावले. महाराष्ट्राने सांघिक गटात ६५ गुणांसह दुसरे स्थान पटकावले. पहिल्याच आयोजित करण्यात आलेल्या स्पोर्ट्स आणि फिजिक स्पर्धेत महाराष्ट्राच्या मिहिर सिंगने साऱ्यांची मने जिंकत निर्विवादपणे जेतेपदाला गवसणी घातली.
स्पर्धेचा निकाल :
५५ किलो : १. जे. चक्रवर्ती (भारतीय रेल्वे), २. अरुण दास सीव्ही  (नौदल), ३. सुनील सकपाळ  (महाराष्ट्र)
६० किलो : १. स्वप्निल नरवडकर (महाराष्ट्र), २. के. हरी बाबू (भारतीय रेल्वे), ३. अनुप राजू (भारतीय रेल्वे)
६५ किलो : १. एस. जेयकुमार (तामिळनाडू), २. एम. बी. सतीशकुमार (भारतीय रेल्वे), ३. जीलानी (कर्नाटक)
७० किलो : १. टी. श्रीनिवास राव (नौदल), २. रियाझ टी.के. (केरळ), ३. अनास हुसैन (भारतीय रेल्वे)
७५ किलो : १. एन. सरबू सिंग (भारतीय रेल्वे), २. सागर कातुर्डे (महाराष्ट्र), ३. पी. आर. रॉबिन्सन  (नौदल)
८० किलो : १. बी. महेश्वरन (महाराष्ट्र), २. सुनीत जाधव (महाराष्ट्र), ३. कमलेश पी. नाईक (नौदल)
८५ किलो : १. राहुल बिश्त (भारतीय रेल्वे), २. सागर माळी (महाराष्ट्र), ३. श्रीकांत सिंग (उत्तर प्रदेश)
९० किलो : १. राम निवास (भारतीय रेल्वे), २. रेणसू चंद्रन  (महाराष्ट्र), ३. अनीस ओ. (नौदल)
९० ते १०० किलो : १. मुरली कुमार (नौदल), २. किरण पाटील (भारतीय रेल्वे), ३. अक्षय मोगरकर   (महाराष्ट्र)
१०० किलोवरील : १. हरी प्रसाद एस.पी. (नौदल), २. जावेद अली खान (भारतीय रेल्वे), ३. एस. श्याम शर्मा  (रेल्वे)
स्पोर्ट्स फिजिक स्पर्धा : १. मिहिर सिंग  (महाराष्ट्र), २.कबीर दिदान (मेघालय), ३. अनिल साटी (उत्तर प्रदेश)
चॅम्पियन ऑफ चॅम्पियन : मुरली कुमार
सर्वोत्तम प्रगतीकारक शरीरसौष्ठवपटू : स्वप्निल नरवडकर
सर्वोत्तम शरीर प्रदर्शक शरीरसौष्ठवपटू : जे. चक्रवर्ती
सांघिक जेतेपदे : १. भारतीय रेल्वे : ८६ गुण, २. महाराष्ट्र : ६५ गुण, ३. नौदल : ५८ गुण