माझे जेतेपद देशभरातल्या मुलींसाठी प्रेरणादायी ठरेल, असा आशावाद सानिया मिर्झाने व्यक्त केला. मार्टिना हिंगिसच्या साथीने खेळताना सानिया मिर्झाने विम्बल्डन टेनिस स्पर्धेत कारकीर्दीतील पहिल्यावहिल्या महिला दुहेरीच्या ग्रँड स्लॅम जेतेपदाची कमाई केली.
‘‘अन्य लोकांसाठी प्रेरणादायी ठरणे अनोखे असते. त्याचा विचार करून मी खेळले नाही. फक्त जिंकण्याचे उद्दिष्ट ठेवून मी खेळ केला. परंतु हे जेतेपद देशभरातल्या मुलींना आपापल्या क्षेत्रात सर्वोत्तमाचा ध्यास जपण्यासाठी प्रेरणादायी ठरेल,’’ असे सानियाने सांगितले.
ती पुढे म्हणाली, ‘‘विम्बल्डनसारख्या प्रतिष्ठेच्या स्पर्धेच्या अंतिम लढतीत अव्वल आणि द्वितीय मानांकित जोडय़ांमध्ये रंगलेला अंतिम मुकाबला दर्जेदार टेनिसची पर्वणी देणारा होता. थरारक क्षणांची अनुभूती देणारा सामना होता. आम्ही पिछाडीवर होतो. पण या स्थितीतूनही पुनरागमन करू शकतो, हा विश्वास होता. आयुष्यभराचे स्वप्न प्रत्यक्षात साकारण्यासाठी जीव तोडून खेळ केला. हे जेतेपद जिंकणे आमच्यासाठी सन्मान आहे.’’
‘‘नावामागे ‘विम्बल्डन विजेती’ म्हणून बिरुदावली लागणे, ही भावना अद्भुत आहे. जेतेपदानंतर आराम करण्याचा अजिबात विचार नाही.
अमेरिकन खुल्या स्पर्धेसाठी तयारी सुरू झाली आहे. व्हेसनिना-माकारोव्हा यांनी अफलातून खेळ करत तगडे आव्हान उभे केले. मोक्याच्या क्षणी खेळ उंचावल्यामुळे विजय साकारला,’’ असे सानियाने सांगितले.