न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी आपण उपलब्ध नसल्याचे स्पष्ट केल्यानंतर दक्षिण आफ्रिकेचा आघाडीचा फलंदाज एबी डी’व्हिलियर्स निवृत्त होणार, अशा चर्चांना ऊत आला होता. पण आपण कसोटी क्रिकेटमधून निवृत्त होणार नसल्याचे डी’व्हिलियर्सने स्पष्ट केले. यासोबतच देशासाठी एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक जिंकवून देण्याचे स्वप्न असल्याचेही त्याने सांगितले. तो म्हणाला की, मी दुखापतीतून सावरलो आहे, पण अजूनही काही गोष्टींचा मला विचार करायचा आहे. आतापर्यंत दक्षिण आफ्रिकेने एकदाही विश्वचषक जिंकलेला नाही. त्यामुळे देशासाठी मला २०१९ साली होणारी विश्वचषक स्पर्धा जिंकून द्यायची आहे.

वाचा: ‘कोहलीपेक्षा सचिन कितीतरी पटीने चांगला खेळाडू’

न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत न खेळण्याचा निर्णय घेतला असला तरी मी एकदिवसीय क्रिकेटमध्ये खेळणार आहे. पण याचा अर्थ मी कसोटी क्रिकेट खेळणार नाही असे होत नाही. सध्या मी काही गोष्टींचा विचार करत आहे आणि त्यासाठी मला थोडा वेळ लागेल, असेही तो पुढे म्हणाला.

 

वाचा: शतकानंतरही केदारचे पाय जमिनीवरच

डी’व्हिलियर्सने दक्षिण आफ्रिकेकडून १०६ कसोटी सामन्यांत ५०.४६ च्या सरासरीने धावा केल्या आहेत. तो म्हणाला की, २०१९ सालचा विश्वचषक जिंकणे हे माझे मुख्य उद्दीष्ट आहे आणि त्यासाठी जे काही करावे लागेल ते सारे करण्याची माझी तयारी आहे. अर्थात क्रिकेटच्या सर्व प्रकारात खेळणे महत्त्वाचे आहे. पण विश्वचषक जिंकण्याच्या उद्देशाने मानसिक आणि शाररिक तयारी ठेवण्यासाठी मला थोडा वेळ देण्याची गरज आहे. ठराविक सामने खेळण्याचा निर्णय मला यापुढील काळात घ्यावा लागणार आहे, असे मला वाटते. म्हणजे ते माझ्या मनाला पटणारे नाही. देशासाठी प्रत्येक सामन्यात खेळण्याची संधी मिळणे हे मी भाग्य समजतो. पण भविष्यातील काही उद्दीष्टांसाठी योजना आखण्याची गरज आहे, असेही तो पुढे म्हणाला.