जगज्जेतेपदावर ऑस्ट्रेलियन मोहोर उमटविण्याचा क्रिकेटपटू लिसा स्थळेकरचा इरादा
‘‘आयसीसी महिला विश्वचषक क्रिकेट स्पध्रेत यशस्वी अभियान राखण्यासाठी आम्ही खास योजना आखली आहे आणि जगज्जेतेपदावर ऑस्ट्रेलियाची मोहोर उमटविण्याचा इरादा आहे. गेल्या वर्षी श्रीलंकेत झालेल्या आयसीसी महिला ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पध्रेत आम्ही संपादन केलेले जेतेपद माझ्यासाठी खास होते. कारण २०१०चे विश्वविजेतेपद टिकविण्यात दोन वर्षांनंतर आम्ही यशस्वी ठरलो होतो. ट्वेन्टी-२० असो किंवा ५० षटकांचा असो, विश्वचषक जिंकणे, हा क्रीडापटूच्या आयुष्यातील विशेष महत्त्वाचा क्षण असतो. कारण हा क्षण वारंवार अनुभवता येत नाही,’’ अशा भावना ऑस्ट्रेलियाची अष्टपैलू क्रिकेटपटू लिसा स्थळेकरने व्यक्त केल्या. ऑस्ट्रेलियाच्या विश्वविजेत्या संघातील खेळाडू होण्याचा मान लिसाने तीनदा प्राप्त केला आहे. आता मुंबईत चौथ्यांदा हे स्वप्न तिला साद घालत आहे.
‘श्ॉकर’ हे लिसा स्थळेकरचे टोपणनाव. ती जन्माने पुणेकर. परंतु ती लहान असतानाच तिचे कुटुंबिय ऑस्ट्रेलियात स्थायिक झाले. त्यानंतर त्याच देशात ती लहानाची मोठी झाली आणि यशस्वी क्रिकेटपटू म्हणून नाव कमावले. तिच्या महाराष्ट्रीयन आडनावामुळेच सध्या मुंबईत सुरू असलेल्या आयसीसी महिला विश्वचषक क्रिकेट स्पध्रेतील तिच्या प्रत्येक यशाबद्दल आपल्या सर्वाना आपुलकी वाटते.  
गेल्या वर्षी प्रकाशित झालेल्या ‘श्ॉकर : रन मेकर, विकेट टेकर’ या आपल्या आत्मचरित्रात स्थळेकरने म्हटले आहे, ‘‘मी प्रत्येकदा मैदानावर जाते तेव्हा विचार आणि कृती एखाद्या ऑस्ट्रेलियन खेळाडूप्रमाणेच असते. जिंकण्याच्या ईष्रेने आणि स्वत:चे सर्वोत्तम प्रदर्शन करण्याच्या हेतूने मी आक्रमक पद्धतीने खेळते. माझे वय वाढत गेले, तसतसा खेळ अधिक परिपक्व होत गेला. माझे प्रशिक्षक याचप्रमाणे ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेटचा अभिमानास्पद इतिहास आणि यश नेहमीच माझ्यासाठी प्रेरणादायी ठरले. फक्त फरक इतकाच आहे की, मी भारतीय क्रिकेटपटूप्रमाणे फलंदाजी करते. मी माझ्या खेळण्याच्या शैलीशी लढा दिला नाही. फलंदाजी करताना मी साधी गोष्ट पाळते, चेंडू पाहायचा आणि धावा मिळतील असा स्ट्रोक खेळायचा. भरपूर धावा काढण्यासाठी माझी भारतीय मनगटे मला मदत करतात.’’
एकदिवसीय क्रिकेटमध्ये एक हजार धावा आणि १०० बळी असा अष्टपैलू टप्पा ओलांडणारी लिसा पहिली महिला क्रिकेटपटू. जागतिक महिला क्रिकेट क्रमवारी अस्तित्वात आल्यापासून अष्टपैलू आणि गोलंदाज या यादीत स्थळेकरने आपले नाव नेहमीच अग्रेसर ठेवले आहे. आता वयाच्या ३३व्या वर्षी कारकीर्दीच्या अखेरच्या टप्प्यावर लिसा उभी आहे. मुंबईतील विश्वचषक स्पध्रेच्या निमित्ताने लिसा स्थळेकरने खास ‘लोकसत्ता’शी केलेली बातचीत-
तू पुण्यात जन्मलीस आणि ऑस्ट्रेलियाचे प्रतिनिधित्व करतेस. भारताशी तुझे नेमके काय नाते आहे?
माझे कुटुंब हे मूळचे भारतातील. मी बऱ्याच वर्षांपूर्वी माझी आजी आणि काही नातेवाईकांना भेटायला आले होते. १९९५मध्ये माझ्या आजीचे निधन झाले. त्यानंतर क्रिकेटच्या दौऱ्यांव्यतिरिक्त कौटुंबिक भारतात येणे कधीच झालेले नाही.
तुला क्रिकेटपटू म्हणून घडविण्यात वडिलांचे काय योगदान आहे?
माझा मैदानाकडेच ओढा आहे आणि क्रिकेटची मला अतिशय आवड आहे, ही गोष्ट माझ्या वडिलांनी हेरली. ते चांगले क्रिकेटपटू होऊ शकले नाही, परंतु मला चांगले क्रिकेटपटू घडविण्यासाठी आवश्यक असलेले प्रशिक्षण आणि अन्य सोयी-सुविधा मिळतील, याची त्यांनी जिवापाड काळजी घेतली. ते निष्णात क्रीडा मानसतज्ज्ञ आहेत. त्यामुळे आतापर्यंतच्या कारकीर्दीत वडिलांची मोलाची मदत मला लाभली आहे.
तू उत्तम ऑफ-स्पिनर आहेस आणि जन्माने भारतीय आहेस. भारत हे फिरकी गोलंदाजांचे नंदनवन मानले जाते. याबाबत तू काय सांगशील?
मी मोठी होत असताना मुलांसोबतच क्रिकेट खेळायचे. मुलांच्या तुलनेत मी छोटी असल्याने ते मला फिरकी गोलंदाजीच करायला सांगायचे. त्यामुळे हीच आवड पुढे मी आनंदाने जोपासली.
ऑस्ट्रेलियात पुरुषांच्या क्रिकेटच्या तुलनेत महिलांच्या क्रिकेटची वाटचाल कशी सुरू आहे?
महिलांची क्रिकेट ऑस्ट्रेलिया ही संघटना क्रिकेट ऑस्ट्रेलियामध्ये विलीन झाल्यापासून आम्हाला चांगले दिवस आले आहेत. क्रिकेटचे प्रशिक्षण आणि दौरे वाढल्यामुळे ऑस्ट्रेलियातील महिलांच्या क्रिकेटचा दर्जा कमालीचा उंचावला आहे. गेल्या काही वर्षांत ऑस्ट्रेलियाच्या संघातील महत्त्वाच्या खेळाडूंनी अनेक दौरे केले आहेत. या चमूसोबत क्रिकेटच्या यशस्वी दौऱ्यांचा मीसुद्धा आनंद लुटला आहे.
हा विश्वचषक भारतामध्ये फिरकीला अनुकूल असणाऱ्या खेळपट्टय़ांवर चालू आहे. या दृष्टीने तू काय तयारी केली?
श्रीलंकेत फिरकीला अनुकूल वातावरणात ट्वेन्टी-२० विश्वचषक खेळण्याचा फायदा आता आम्हाला भारतात खेळताना होत आहे. याचप्रमाणे गेल्या वर्षी मार्च महिन्यात आमचा संघ भारत दौऱ्यावर आला होता. त्यामुळे संघातील बहुतांशी खेळाडूंना भारतीय उपखंडातील खेळपट्टय़ांवर खेळण्याचा अनुभव आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियाचा संघ भारतात चांगली कामगिरी बजावत आहे.
अ‍ॅलन बोर्डर पदकासहित तू अनेक प्रतिष्ठेचे पुरस्कार पटकावले आहेस. क्रिकेटपटू म्हणून आणखी कोणती स्वप्ने तुझी पूर्ण व्हायची आहेत?
आम्ही आमच्या क्रिकेट हंगामाचा प्रारंभ ट्वेन्टी-२० विश्वचषक जिंकून झोकात केला. आता हंगामाचा शेवटसुद्धा आयसीसी महिला विश्वचषक जिंकून शानदार पद्धतीने करायचा आहे. मी फार पुढचा विचार केलेला नाही. पण या क्षणी तरी मी हे अल्प मुदतीचे ध्येय निश्चित केले आहे.