दुखापतींमुळे सरते वर्ष निराशाजनक ठरलेल्या राफेल नदालने नव्या वर्षांतील पहिलेवहिले ग्रँड स्लॅम असणाऱ्या ऑस्ट्रेलियन खुल्या स्पर्धेत विजयी सलामी दिली. १४ ग्रँड स्लॅम जेतेपदे नावावर असणाऱ्या नदालने जर्मनीच्या फ्लोरियन मेयरवर ६-३, ६-४, ६-४ असा सहज विजय मिळवला. जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी पुन्हा विराजमान होण्यासाठी प्रयत्नशील नोव्हाक जोकोव्हिच व सेरेना विल्यम्स यांनीही विजयी आगेकूच केली.

गेल्या वर्षी ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेत नदालला सलामीच्या लढतीतच पराभवाला सामोरे जावे लागले होते. नदालचा मित्र फर्नाडो व्हर्डास्कोनेच त्याला नमवण्याची किमया केली होती. मात्र यंदा नदालने मेयरला चमत्काराची कोणतीही संधी दिली नाही. ‘‘मेयरचा खेळ वेगळा आहे. प्रत्येक फटका काळजीपूर्वकच खेळावा लागतो. गेले संपूर्ण वर्ष दुखापतींनी सतावले होते. मात्र यंदाच्या पहिल्याच ग्रँड स्लॅम स्पर्धेत विजयी सलामी देऊ शकलो याचे समाधान आहे. सुरुवात चांगली झाली आहे. हाच सूर कायम राखत वाटचाल करायची आहे. आता मी पूर्ण तंदुरुस्त आहे,’’ असे नदालने सांगितले. २००९मध्ये नदालने या स्पर्धेचे जेतेपद पटकावले होते. दुखापतींमुळे गेल्या वर्षी प्रदीर्घ काळ कोर्टपासून दूर असल्याने नदालला या स्पर्धेसाठी नववे मानांकन देण्यात आले.

२३व्या विक्रमी ग्रँड स्लॅम जेतेपदासाठी आतुर सेरेना विल्यम्सने नव्या वर्षांची सुरुवात विजयाने केली. बेलिंडा बेनकिकवर ६-४, ६-३ अशी मात करत सेरेनाने ग्रँड स्लॅम अभियानाची दिमाखात सुरुवात केली. गेल्या वर्षीच्या अमेरिकन खुल्या स्पर्धेत सेरेनाला उपांत्य फेरीत अनपेक्षित पराभवाला सामोरे जावे लागले होते. मात्र त्यानंतर दुखापतीमुळे सेरेनाला खेळताच आले नाही. प्रत्येक ग्रँड स्लॅम स्पर्धेत जेतेपदाची दावेदार असणाऱ्या सेरेनाला यंदा द्वितीय मानांकन देण्यात आले आहे. मात्र सारा अनुभव पणाला लावत जेतेपद नावावर करण्यासाठी सेरेना सज्ज आहे.

जोकोव्हिचने फर्नाडो व्हर्डास्कोवर ६-१, ७-६ (७-४), ६-२ असा विजय मिळवला. गतविजेत्या जोकोव्हिचने सहज विजय मिळवत आश्वासक सुरुवात केली. या स्पर्धेची सहा जेतेपदे नावावर असणाऱ्या जोकोव्हिचच्या खेळातील सातत्य आणि अचूकता गेल्या वर्षी दुखापतीमुळे हरपली. मात्र नव्या प्रशिक्षकांसह खेळणाऱ्या जोकोव्हिचने उत्तम सूर गवसल्याचे सिद्ध केले. जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानी घसरण झालेल्या जोकोव्हिचला द्वितीय मानांकन देण्यात आले आहे. गेल्या वर्षी नदालला गाशा गुंडाळायला लावणारा व्हर्डास्को जोकोव्हिचला धक्का देणार अशी चर्चा होती. मात्र जोकोव्हिचने व्यावसायिक खेळ करत व्हर्डास्कोला चमत्काराची कोणतीही संधी दिली नाही. मिलास राओनिकने डस्टीन ब्राऊनला ६-३, ६-४, ६-२ असे नमवले. गेइल मॉनफिल्सने जिरी वेस्लेला ६-२, ६-३, ६-२ असे नमवले.

महिलांमध्ये हिथर वॉटसनने समंथा स्टोसूरचा ६-३, ३-६, ६-० असा पराभव केला. पाचव्या मानांकित कॅरोलिन प्लिसकोव्हाने सारा सॉरिबेस टॉर्मोचा ६-२, ६-० असा पराभव केला. जोहाना कोन्टाने कर्स्टन फ्लिपकेन्सवर ७-५, ६-२ अशी मात केली. डॉमिनिका सिबुलकोव्हाने डेनिसा अलटरेव्हावर ७-५, ६-२ असा विजय मिळवला.