प्राचार्य अरुणराव कलोडे स्मृती राज्य बुद्धिबळ स्पर्धेत आठव्या फेरीनंतर आघाडीवर असलेल्या ओम विटाळकरने नववी फेरी बरोबरीत सोडवून मुलांच्या गटात तर निती तातियाने स्पर्धेतील विजयी घोडदौड कायम ठेवत विजेतेपद पटकावले. दोन्ही नागपूरकर खेळाडूंनी अग्रमानांकित खेळाडूंना पराभूत करून अजिंक्य ठरले.
खामल्यातील गुलमोहर सभागृहात या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. राज्यस्तरीय फिडे मानांकन बुद्धिबळ स्पर्धेच्या नवव्या फेरीला प्रारंभ झाला तेव्हा मुलांमध्ये ओम विटाळकर व मुलींमध्ये निती तातिया आघाडीवर होते. मुलांच्या गटातील अंतिम फेरीत पहिल्या पटावर तिसऱ्या मानांकित ओम विटाळकरला दहाव्या मानांकित नागपूरच्या सलिल देवगडेने बरोबरीत रोखले. दोन्ही खेळांडूना अर्धे गुण मिळाले. परंतु आठव्या फेरीनंतर गुणसंख्या ७.५ करून एकमेव आघाडी घेणाऱ्या ओम विटाळकरची गुणसंख्या ८ झाली व सलिलची गुणसंख्या ७.५ झाली. दरम्यान, दुसऱ्या पटावर अग्रमानांकित भाविक भारंबेने केदार मोरवेकरला पराभूत करीत गुणसंख्या ७.५ केली. ओमला विजेतेपदासाठी अर्धा गुण आवश्यक होता. त्यामुळे ८ गुणांसह ओम विजेता ठरला. भाविक भारंबे, किष्णेतर कुशगेर (ठाणे) यांची गुणसंख्या ७.५ अशी सारखी राहिली. त्यामुळे तांत्रिक गुणाच्या आधारे सलिलला द्वितीय तर भाविकला तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले.
मुलींच्या गटातील अंतिम फेरीत सहाव्या मानांकित नागपूरच्या निती तातियाने आठव्या फेरीप्रमाणे नवव्या फेरीत उत्कृष्ट करीत विजयी मोहीम कायम ठेवली. पहिल्या पटावरील लढतीत नितीने तनया पांडेला पराभूत करीत गुणसंख्या सर्वाधिक ८ करीत विजेतेपदाची मानकरी ठरली. सृष्टी पांडेला पराभूत करणाऱ्या वैभवी जाधव आणि खुशी सुरानाला पराभूत करणाऱ्या मुदुल डेहनकर याची गुणसंख्या ७ होती. त्यामुळे तांत्रिक गुणाच्या आधारे मुंबईची वैभवी जाधव द्वितीय स्थानी आणि नागपूरची मुदुल डेहनकर तिसऱ्या स्थानावर राहिली. नागपूरची सृष्टी पांडे चौथ्या आणि मुंबईची इकिशा बसू पाचव्या स्थानावर राहिली. मुलींच्या गटातील अग्रमानांकित महिला फिडे मास्टर नागपूरच्या दिव्या देशमुखला १२ व्या स्थानी समाधान मानावे लागले. आदिवासी विभागाच्या आयुक्त पल्लवी दराडे यांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिके देण्यात आली. यावेळी योगाचार्य रामभाऊ खांडवे, वीणा कलोडे, नागपूर चेस अकादमीचे अध्यक्ष व्ही.के. त्रिवेदी, आशीष कलोडे, बुद्धिबळ संघटनेचे सचिव दिलीप पागे उपस्थित होते.