दक्षिण आफ्रिकेबरोबरचा सामना केवळ तीन दिवसांमध्ये संपला, यामध्ये खेळपट्टीचा कोणताही दोष नाही. खेळपट्टीबाबत टीका करणे टाळावे, असे भारतीय संघाचे संचालक रवी शास्त्री यांनी सांगितले.
भारताने चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली आहे. एक कसोटी सामना पावसामुळे अपूर्णच राहिला होता. खेळपट्टय़ा फिरकी गोलंदाजीला अनुकूल बनवण्यात आल्या होत्या, अशी टीका करण्यात आली होती. ‘‘दक्षिण आफ्रिकेने याबाबत कोणतीही टीका केली नसतानाही खेळपट्टीबाबत काही जण टीका करीत आहेत, हे अयोग्य आहे. नागपूर येथील कसोटीत प्रत्येक दिवशी चेंडू वळत होते. आफ्रिकेकडे फिरकी गोलंदाज असताना त्याचा फायदा त्यांना घेता आला नाही. आमच्या गोलंदाजांनी त्याचा फायदा मिळविला, यामध्ये गोलंदाजांचे कौशल्य आहे. फलंदाज झटपट बाद होतात, हे स्वत:च्या चुकीमुळेच. ते योग्य रीतीने फिरकीला सामोरे गेले तर धावा आपोआप मिळू शकतात. झटपट क्रिकेटच्या सवयीमुळे दीर्घकाळ खेळपट्टीवर राहणे त्यांना जमत नाही ही वस्तुस्थिती आहे,’’ असे शास्त्री यांनी सांगितले.
‘‘हशिम अमला, ए बी डी’व्हिलियर्स, फॅफ डू प्लेसिस आदी अव्वल दर्जाचे फलंदाज आफ्रिकेकडे आहेत. या फलंदाजांनी अनेक सामन्यांमध्ये फिरकी गोलंदाजांचा खरपूस समाचार घेतला आहे. जर आत्मविश्वासाने व योग्य तंत्राचा उपयोग केला, तर फिरकीला अनुकूल असलेल्या खेळपट्टीवर शतकही झळकावता येते, याचा प्रत्यय अनेक वेळा आला आहे. या खेळपट्टीवर चारशेहून अधिक धावा झाल्या आहेत. साहजिकच अशा खेळपट्टय़ांबाबत टीका करण्याची वृत्ती टाळली पाहिजे,’’ असेही शास्त्री यांनी सांगितले.