एक तपापासून नाशिक जिल्हा क्रिकेट संघटनेवर अबाधित असलेले आपले वर्चस्व कायम ठेवण्यात विद्यमान अध्यक्ष व राज्य संघटनेचे उपाध्यक्ष धनपाल ऊर्फ विनोद शहा हे यशस्वी झाले असून २०१५-१८ या वर्षांसाठी झालेल्या निवडणुकीत सत्ताधाऱ्यांनी सर्वच्या सर्व १८ जागांवर विजय मिळवीत मकरंद ओक यांच्या विरोधी परिवर्तन पॅनलचा धुव्वा उडविला. अध्यक्षपदी शहा हे ८९८ मते मिळवून निवडून आले.
संघटनेचे २०५६ आजीव सभासद व ७३ क्लब सदस्य असून १२८३ जणांनी मतदानाचा हक्क बजावला. शनिवारी मतदानानंतर लगेचच मतमोजणीला सुरुवात झाली. रात्री उशिरा मतमोजणी संपली.
निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अ‍ॅड. मनीष लोणारी यांनी रविवारी तुपसाखरे लॉन्स येथे आयोजित सभेत अधिकृत निकाल जाहीर केला. सचिवपदी समीर रकटे (९४६), सहसचिव योगेश हिरे (९३३), आनंद शेट्टी (८१७), खजिनदार हेमंत देशपांडे (८८१), निवड समिती सदस्य शेखर गवळी (८७४), तरुण गुप्ता (८६५), दीपक केळकर (८२२) हे महत्त्वाच्या पदांवरील विजयी उमेदवार होत.