प्लेझन, चेक प्रजासत्ताक येथे झालेल्या कनिष्ठ खेळाडूंसाठीच्या शूटिंग होप्स आंतरराष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत नाशिकच्या श्रेया गावंडेने दुहेरी सुवर्णपदकावर कब्जा केला. १८ वर्षीय श्रेया गावंडेने २५ मीटर पिस्तूल प्रकारात सुवर्णपदक पटकावले. पात्रता फेरीत तिने ६०० पैकी ५७३ गुणांची कमाई केली होती. अंतिम मुकाबल्यात श्रेयाने पोलंडच्या क्लॉडिआ ब्रेसवर मात केली. जर्मनीच्या जोसफिन इडरने कांस्यपदकावर नाव कोरले. त्याआधी झालेल्या १० मीटर एअर पिस्तूल प्रकारात श्रेयाने सुवर्णपदकची कमाई केली. पात्रता फेरीत ३८५ गुण मिळवणाऱ्या श्रेयाने अंतिम लढतीत २००.५ गुण मिळवले. भारताच्याच श्री निवेथाने रौप्यपदक पटकावले.