‘‘रविचंद्रन अश्विन हा सध्याच्या काळातील महान फिरकी गोलंदाज आहे. त्याच्याकडून शिकण्यासारख्या भरपूर गोष्टी आहेत. भारतामधील मालिकेत मी त्याच्या गोलंदाजीचे बारकाईने निरीक्षण करीत अनेक गोष्टी आत्मसात करणार आहे,’’ असे ऑस्ट्रेलियाचा फिरकी गोलंदाज नॅथन लिऑन याने सांगितले.

‘‘भारतीय उपखंडातील खेळपट्टय़ा आमच्यापेक्षा खूप वेगळय़ा असतात. हे लक्षात घेऊनच मी या मालिकेसाठी सराव करताना माझ्या तंत्रात खूप काही बदल केले आहेत. अर्थात, प्रत्यक्ष सामन्यात खेळपट्टी कशी साथ देते यावरच आमचे यशापयश अवलंबून आहे,’’ असे लिऑनने सांगितले.

तो पुढे म्हणाला, ‘‘अश्विनच्या गोलंदाजीचे चित्रीकरण मी बारकाईने पाहात आलो आहे व अजूनही पाहणार आहे. गोलंदाजी करताना त्याच्या हातापायांची हालचाल कशी असते, तो चेंडू कसा टाकतो हे पाहणेदेखील उत्सुकतेचे आहे.’’

‘भारताविरुद्ध प्रभावी गोलंदाजी करणे ही माझ्यासाठी सत्त्वपरीक्षा आहे. येथील खेळपट्टय़ांवर फिरकी गोलंदाजांचे वर्चस्व राहणार आहे, याबाबत मला कोणतीही शंका नाही. वेगवान फिरकी मारा करण्यावर माझा भर असेल. फिरकी गोलंदाज म्हणून माझ्यावर संघाची मोठी जबाबदारी आहे. हे आव्हान यशस्वीरीत्या पेलविण्यासाठी मी क्षमतेच्या शंभर टक्के कामगिरी करणार आहे,’’ असे लिऑनने सांगितले.